
आता ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून या महिन्यात अपेक्षित पाऊस होणार नसल्याचे सुरूवातीला सांगितले गेले. मात्र, भारतीय हवामान विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा नक्कीच मिळाला. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज थेट भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचे सांगण्यात आल्याने पिकांमुळे शेतकरी राजा चिंतेत होता. मुंबईमध्ये आज सकाळीच पावसाने हजेरी लावलीये. कालही काही भागांमध्ये पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार आज (3 ऑगस्ट) राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वारे विजांसह पाऊस पडेल.
हवामान विभागाकडून विदर्भात येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहिलं. पुण्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठा हा चांगलाच वाढलाय. खडकवासला धरणक्षेत्रातून मोठा पाणीसाठा मुळा मुठा नदीत विसर्ग करण्यात आला आहे.
खडकवासला 1.18 टीएमसी, पानशेत 9.49 टीएमसी, वरसगाव 11.44 टीएमसी, टेमघर 3.54 टीएमसी याप्रमाणे. कोकणात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सप्टेंबर महिन्यात देखील पाऊस चांगला राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे सध्या बघायला मिळतंय.