अन् हिंदू कुटुंबातून निघाला जनाजा! 80 वर्ष सेवा, 100 व्या वर्षी मृत्यू; जळगावात दिसलं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अस्सल चित्र

कय्युम खान नूर खान हे गेल्या आठ दशकांपासून सराफा कारागीर म्हणून काम करत होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ते हिंदू कुटुंबाकडे कामाला आले. आता त्यांच्या निधनानंतर या हिंदू कुटुंबाने जनाजा काढला आहे.

अन् हिंदू कुटुंबातून निघाला जनाजा! 80 वर्ष सेवा, 100 व्या वर्षी मृत्यू; जळगावात दिसलं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अस्सल चित्र
Jalgaon Janaja
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 08, 2026 | 1:50 PM

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या धामधूमीत आरोप-प्रत्यारोप आणि धार्मिक वादांचं राजकारण जोरात सुरु आहे. हे सर्व सुरु असताना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. ही घटना राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खरं तर झणझणीत अंजन घालणारी आहे. एका हिंदू कुटुंबात गेल्या 80 वर्षांपासून राहणाऱ्या मुस्लिम वृद्धाचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर, त्यांचा जनाजा थेट त्या हिंदू कुटुंबाच्या घरातूनच काढण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

20व्या वर्षी हिंदू कुटुंबीयांकडे काम करण्यास सुरुवात

यावल शहरातील बारी वाडा परिसरात अशोक देवरे-सोनार, ज्योती देवरे-सोनार आणि ऋषी देवरे-सोनार यांच्या कुटुंबाकडे कय्युम खान नूर खान हे गेल्या आठ दशकांपासून सराफा कारागीर म्हणून काम करत होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ते या कुटुंबाकडे कामाला आले आणि त्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य याच कुटुंबासोबत व्यतीत झाले. देवरे कुटुंबाने त्यांना आपल्या परिवाराचा अविभाज्य भाग मानले आणि त्यांची काळजी घेतली.

वृद्धापकाळाने कय्युम खान यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे मूळ कुटुंबीय (काजीपुरा भागातील) मुस्लिम रीतिरिवाजानुसार अंत्यविधी करण्याची तयारी करत होते. मात्र, देवरे-सोनार कुटुंबाने भावनिक विनंती केली की, “आजोबांचे संपूर्ण आयुष्य आमच्या घरात गेले आहे. त्यामुळे मुस्लिम पद्धतीने का होईना, त्यांचा जनाजा आणि अंत्ययात्रा आमच्या घरातूनच काढावी.” याशिवाय, पुणे आणि मुंबईत राहणारी त्यांची मुले, मुली आणि जावई अंतिम दर्शनासाठी येणार असल्याने एक दिवसाचा अवधी देण्याचीही विनंती केली.

कय्युम खान यांच्या कुटुंबीयांनी ही भावनिक विनंती मान्य केली आणि देवरे-सोनार यांच्या घरातूनच मुस्लिम रीतिरिवाजानुसार जनाजा काढण्यात आला. ही घटना पाहून शहरवासीय भारावून गेले आणि राष्ट्रीय एकतेचे एक अद्भुत उदाहरण समोर आले. मयत कय्युम खान यांच्या पश्ताच दोन पुतणे, शिक्षक सादिक खान शाकीर खान आणि जाकीर खान शाकीर खान असा परिवार आहे. अशा घटना सांगतात की खरे प्रेम आणि बंधुत्व धार्मिक सीमारेषांपलीकडे जाते.