लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, या मंत्र्यांने चोळले शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, म्हणाले निवडून येण्यासाठी आम्ही आश्वासनं…

Loan Waiver : कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यांच्या संकल्पपत्रात त्याचा उल्लेख आहे. पण कर्जमाफीचा विषय निघाला की मंत्री कसा विषय बदलतात हे नवीन नाहीत. आता तर या मंत्री महोदयांनी सरकारच्या मनातील वाक्यच जणू ओठांवर आणलं आहे.

लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, या मंत्र्यांने चोळले शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, म्हणाले निवडून येण्यासाठी आम्ही आश्वासनं...
बाबासाहेब पाटील
| Updated on: Oct 10, 2025 | 1:46 PM

Cooperative Minister Babasaheb Patil : लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे , कर्जमाफी वरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी असं वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला निवडून यायचे आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो, असा दावा महायुतीमधील महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारच्या मनातील भावना आता मंत्री महोदयाच्या जणू ओठांवर आल्याचे दिसून येते. कर्जमाफी व्हावी यासाठी शेतकरी आग्रही आहे. पण सरकार कर्जमाफीच्या आश्वासनावर किती ठाम आहे हे वक्तव्य त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. निवडणुकीत अनेकदा आश्वासनांची गाजरं दाखवल्या जातात. दिवास्वप्न दाखवण्यात येतात. एकदा निवडून आले की मग तुम्ही कोण आणि मी कोण? असा मामला असतो. सहकार मंत्र्यांचे हे वक्तव्य याच धोरणाचा भाग आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

गावात नदी आणून देण्याचे आश्वासन

बाबासाहेब पाटील यांनी जनतेला एकदम येड्यात काढलं. आपल्या भाषणात त्यांनी लोकांच्या मागणीकडे लक्ष वेधले. निवडणूक काळात लोक काय काय अजब मागण्या करतात, याचा पाढाच त्यांनी वाचला. पण यावर राजकीय पुढाऱ्यांकडे कसा जालीम उपाय आहे, याचं खणखणीत उत्तरंही पाटील यांनी दिलं.

“निवडणुकीच्या काळात कोणी गावात नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून यायचे असल्याने नदी आणून दिल्याचं आश्वासन दिले जाते.” असं सहकार मंत्री म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा तालुक्यात घोडगाव येथे पीपल्स बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी एकीकडे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले तर दुसरीकडे मतदारांच्या, नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं.

नंतर जाहीर दिलगिरी

सहकार मंत्र्यांना हे वक्तव्य इतकं अंगलट येईल, याची कदाचित कल्पना नव्हती. ते भाषणाच्या ओघात मनातील धडाधड बोलून गेले. पण या वक्तव्याचे राज्यात जोरदार पडसाद उमटले. एकतर अतिवृष्टी आणि महापूराने राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यातच सरकार देत असलेली मदत ही तुटपूंजी असल्याची ओरड होत आहे. अनेक ठिकाणी अजून पंचनामे झाले नाहीत. या सर्वांचा मनस्ताप आणि सरकारविरोधात संताप असतानाच सहकार मंत्र्यांच्या विधानाने त्यात भर घातली. सोशल मीडिया आणि पारावर या वक्तव्यावर जाहीर नाराजी दिसली. हे प्रकरण जास्तच पांगल्याचे लक्षात येताच मग बाबासाहेब पाटील यांनी कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले. पण जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती असं कोण्या तरी शहाण्यानं म्हटलंच आहे, तसा शहाणजोगपणा मतदारांमध्ये कधी येईल याची खमंग चर्चा यानिमित्तानं सोशल मीडियावर मात्र सुरू आहे.