
अंतरवाली-सराटी, जालना | 29 नोव्हेंबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटीतील उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवली सराटीत परतले. गावात येताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा समाजाला न्याय मिळण्याच हे शक्ती स्थान आहे, त्यामुळे इथ आल्यावर मला आनंद होतेय. माय बापासारखे प्रेम हे माझं गाव करते आहे. संपूर्ण महाराष्ट्राने मला माय बापाची माया दिली. आरक्षण मिळेपर्यंत मी कुटुंबाला भेटणार नाही. तोपर्यंत घरचा उंबरा चढणार नाही. आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू राहील. 1 डिसेंबरपासून दौऱ्याचा चौथा टप्पा सुरू होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
लोक प्रेमापोटी माझ्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करतात. यांच्या का पोटात दुखतंय? माझ्यावर बोलायचंच असेल तर आरक्षणावर बोला. कोणाचा तरी जीव गेलाय, घर उघड्यावर आलंय त्याच्यावर बोला. जेसीबी-जेसीबी काय करतो, असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
बिहारप्रमाणे काहीही करा. मात्र आम्हाला दगा फटका नकोय. आम्हावा आरक्षण पाहिजे. पण कुणाला डावलून नकोय. ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण देवून टक्का वाढवा. मराठा समाजाला आरक्षण द्या इतक्या वर्षांचा अन्याय दूर करा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
बीडमध्ये कोणाला अटक झाली मला माहित नाही. अंतरवालीतील कार्यकर्त्यांना का अटक केली हा माझा प्रश्न नाही. जाळपोळी चे मी समर्थन करत नाही. सरकारने त्यांचं काम करावं. बीड मध्ये त्यांच्याच माणसांनी त्यांचे हॉटेल जाळले. मात्र निष्पाप तरुणांना अटक केली जात आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
आज आमचा दिवस आहे, उद्या तुम्हालाही दिवस येतील. त्यावेळी बघू. सरकारची माणसं माझ्याकडे आली होती. पाच तारखेपर्यंत वेळ मागत होती. आम्ही वेळ देवू, तेवढ्या दिवसात नाही केलं, तर आम्ही आमचं निर्णय घेवू. पाच तारखेपर्यंत थांबून बघू. 24 डिसेंबरपर्यंत सरकारने वेळ घेतलाय. 22 डिसेंबरला अधिवेशन संपणार आहे. कायदा पारित करण्यासाठी 29 डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू ठेवावे अशी माझी मागणी आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.