Manoj Jarange Patil : आरक्षणासंदर्भात उद्या सर्वपक्षीय बैठक, मनोज जरांगे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन काय?

| Updated on: Sep 10, 2023 | 8:01 PM

मराठा आरक्षणासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांची उत्सुकता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यांसदर्भात मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

Manoj Jarange Patil : आरक्षणासंदर्भात उद्या सर्वपक्षीय बैठक, मनोज जरांगे यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन काय?
manoj jarange
Follow us on

मुंबई, १० सप्टेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीत सर्वपक्षीय नेते चर्चा करतील. त्यानंतर यातून काही मार्ग निघतो का, हे पाहावं लागेल. अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला कुणबी समाजाला आरक्षण देण्यास काही ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून जरांगे पाटील यांच्या मागणीवर काही निर्णय घेता येतो का, त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना आंदोलन मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही. विरोधी पक्षांच्या विरोधात आमचे आंदोलन नाही. राजकारण्यांचे आंदोलन नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी हे आंदोलन उभे केले आहे.

भावांनो आम्हाला पाठबळ द्या

आमची मागणी साधी आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे. हे आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात. त्या व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे. तेच मराठ्यांना शंभर टक्के न्याय देऊ शकतात. उद्याची बैठक ही सर्वपक्षीय आहे. माझी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे. भावांना आम्हाला पाठबळ द्या. मराठ्यांना आरक्षण द्या, अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली.

आंदोलनाला पाठिंबा कुणाचा?

राज्याच्या सीमेवरून फाटक्या कपड्यांतील माणूस या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहे. हे लोकं काही येथे फिरायला आले नाही. त्यांना आरक्षण हवे आहे. आरक्षणाची मागणी ही फाटक्या कपड्यांच्या लोकांची आहे. ७०-८० वर्षांच्या माता माऊल्या आंदोलनात येत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अपंग बांधवसुद्धा आले आहेत. याचा अर्थ आम्हाला आता आरक्षण हवंय. आरक्षणाची गरज आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं.

गावागावात साखळी उपोषण करा

मी मराठ्यांना आरक्षण मागतो म्हणून सोडा. या बाहेरून येणाऱ्या लोकांनाही आरक्षण हवे आहे. आपण आपल्या गावात शांततेने साखळी उपोषण सुरू करावेत. आपल्या गावात ठिया मांडून बसा. येथे शांततेत या मला आशीर्वाद द्या, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.