केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 26, 2021 | 10:51 AM

सातपूरचे भाजप मंडलाध्यक्ष इघे यांचा राजकीय खून झाला. भाजपला कोणत्याही मार्गाने रोखता येत नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना असे संपवले जात आहे. याप्रकरणामागे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी जावडेकर यांनी केली.

केंद्रात मोदींचे सुशासन, राज्यात ठाकरेंचे कुशासन; भाजप नेते जावडेकरांचा हल्लाबोल
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे. (सौजन्यः गुगल)
Follow us on

नाशिकः केंद्रामध्ये मोदी सरकारचे सुशासन आहे, तर राज्यात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे कुशासन सुरू आहे, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते. राज्यात पोलिसच बॉम्ब पेरत आहेत. सरकार वसुली करण्यात गुंतले आहे, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाने सुशासन दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

राज्यात दुशासन

प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारचे अटलबिहारी वाजपेयी यांनी रचलेल्या पायावर काम सुरू आहे. हे सुशासन आहे. महाराष्ट्रात मात्र दुशासन आणि कुशासन कार्यरत आहे. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे पोलिसांच्या शिरावर असते. ते बॉम्ब पेरणाऱ्या दहशतवाद्यांना बेड्या ठोकतात. मात्र, राज्यात पोलिसच बॉम्ब पेरण्यात गुंतले आहेत. त्यांनीच खून केले आहेत. स्वतःवरील खटल्यावरून लक्ष हटवण्यासाठी मंत्री गुंतले आहेत. हे कुशासन आहे, अशा शब्दांत जावडेकरांनी यावेळी हल्लाबोल केला.

इघेंचा राजकीय खून

नाशिकमध्ये सातपूर येथील भाजप मंडळाध्यक्ष अमोल इघे यांचा निर्घृण खून झाला. यावरून भाजपने राळ उठवली आहे. याप्रकरणीही जावडेकरांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, सातपूरचे भाजप मंडलाध्यक्ष इघे यांचा राजकीय खून झाला. भाजपला कोणत्याही मार्गाने रोखता येत नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना असे संपवले जात आहे. याप्रकरणामागे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जनतेचा कौल भाजपला

जावडेकर म्हणाले की, महाराष्ट्रात जनतेचा कौल भाजपच्या पारड्यात होता. मात्र, तो शिवसेनेने नाकारला. मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात एकही गोष्ट योग्य घडत नाही, हे सांगायला जावडेकर विसरले नाहीत. कार्यक्रमाला महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरी पालवे, माजी शहराध्यक्ष विजय साने उपस्थित होते.

ही तर सुरुवात…

नाशिक महापालिकेची फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होत आहे. त्या तोंडावर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप ही फक्त झलक आहे. येणाऱ्या काळात त्यात वाढ होणार. विशेष म्हणजे भाजपचे सातपूर मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांचा झालेला खून, यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्याः

राज्यातल्या पहिल्या बैलगाडा शर्यतीप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल

पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन