गर्जना मोर्चात विरोधी पक्षांचे आमदार सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले; कोण काय म्हणालं?
गर्जना मोर्चात विरोधी पक्षांचे आमदार सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. या मोर्चातून विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजप चोरीत सामील असल्याचा आरोप केला.

ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या गर्जना मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते पोहोचले आहेत. विरोधी पक्षातील खासदार आणि आमदार देखील निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार मोदी सरकारवर टीका केली आहे. भाजप चोरीमध्ये भागीदार असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. तर सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे बारा वाजवल्याची टीका आव्हाड यांनी केली.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. आव्हाड म्हणाले, ‘ईव्हीएममध्ये काहीतरी लफडं आहे. ईव्हीएम मॅनेज केले जात आहेत. मतदारयाद्यांमध्ये घोटाळे होत आहेत. या याद्यांमध्ये घोटाळा करण्यासाठी खासगी संस्थांना हाताशी धरल्या जात आहे. त्यामुळे घोळ होत आहे. आम्ही मतचोरी होते, असं सांगत होतो. ईव्हीएममध्ये घोटाळे होत आहेत, असं बोलत होतो. त्यावेळी तुम्ही विश्नास ठेवत नव्हता. जेव्हा दोन आयुक्तांनी लिहून कळवलं, सर्व्हर अॅप कुठून येतात, हे कळत नाही, तेव्हा तुमचाही विश्वास बसला. तेरा कोटी मते गायब केले. फॉर्म क्रमांक 6 मध्ये बदल करणे. संविधानाच्या विरोधात आहे. माझ्या आधी लक्षात आलं होतं. तरुणांना दूर ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न होता’.
‘लोकशाहीचे बारा वाजवण्यात आलं आहे. त्याची सुरूवात ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आयोग निवडताना पंतप्रधान , विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश सदस्य असतील. लोकसभेत कायदा नेला, त्यावेळी सरन्यायाधीशांची गरज नसल्याचे सांगितले. पंतप्रधान निवडतील तो माणूस आणि विरोधीपक्ष निवडतील तो माणूस हा असं ठरवण्यात आलं आहे, असेही ते म्हणाले.
भाजप चोरीत सामील – भास्कर जाधव
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, ‘निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक आयोग सर्व काही करत आहे. या कारभाराच्या विरोधात गर्जना मोर्चा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा आहे’. भाजपवर टीका करताना म्हणाले, ‘भाजप चोरीमध्ये सामील आहे. चोराचे भाऊबंध, चोराचे भागीदार बाजूने उभे राहणारच. आम्ही निवडणूक आयुक्तावर बोलतो, कारण भाजप का बोलतोय, भाजपला मदत होत आहे. भाऊ भाऊ मिळून खाऊ. त्यामुळे ते बोलत आहेत’.
‘आमचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. भाजप स्वत:हून उत्तर देण्यासाठी पुढाकार घेत आहे. भाजपचा या चोरीत हात आहे. भाजपला हे कळून चुकलं आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात कारवाई झाली, तर ते सापडणार आहेत. त्यामुळे भाजप चोरीचा साथीदार आहे. त्यामुळे ते बोलत आहेत, असे ते पुढे म्हणाले.
‘मोर्चाची गर्जना दिल्लीत पोहोचली आहे. सिंहासन डळमळीत झालं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंनी काढलेला मोर्चा. आता सीजेपीने शिवाजी पार्कात काढलेला मोर्चा. उद्धव ठाकरेंनी सीजेपीला दिलेला पाठिंबा. या सर्वांमुळे दिल्लीची खुर्ची हादरली आहे, असेही ते पुढे म्हणाले.