विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट? राऊतांनी फोडला काँग्रेसला घाम; त्या दोन जागांवर…
महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणुकीवरून फूट पडण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे काँग्रेसला धक्का बसला असून, मित्रपक्षांसोबत एकमत न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी राऊतांनी दर्शवली आहे.

विधान परिषदेची निवडणूक अत्यंत रंजक होताना दिसत आहे. या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. काहीही झालं तरी आम्ही मराठवाडा आणि अमरावती विधान परिषदेची निवडणूक लढणार आहोत. आज आमची बैठक होईल. निर्णय झाला तर ठिक, नाही तर आम्ही लढणारच. आम्हालाही पक्ष चालवायचा आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी थेटच विधान केल्याने काँग्रेसला मोठं टेन्शन आलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. आमची विधान परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्याशी चार दिवसांपूर्वी बैठक झाली. काँग्रसे नेते हर्षवर्धन सपकाळ आणि नसीम खान यांच्यासोबतही बैठक झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आहे. पण मित्र पक्षांची गणितं वेगळी आहेत. प्रत्येकाला वाटतं आम्ही मोठी नोंदणी केली आहे. काँग्रेसने नागपूर, अमरावती आणि पुण्यातील शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. आम्ही अमरावती, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ लढणार आहोत. दोन दिवसात आम्ही उमेदवारांची घोषणा करणार आहोत. एकमत होत नसेल तर मैत्रीपूर्ण निवडणुका लढवण्यात येतील, असं संजय राऊत म्हणाले.
त्याला आक्षेप नाही
नागपूरचा पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. त्यावर आमचा आक्षेप नाही. पुण्यातही त्यांचा विद्यमान आमदार आहे. त्यालाही आमचा आक्षेप नाही. पुण्यातील पदवीधर मतदारसंघात आमच्या उमेदवाराने सर्वात जास्त तयारी केली असतानाही आम्ही समन्वयाची भूमिका घेतली आहे. आमचे संभाव्य उमेदवार सुनील मोदी यांनी 53 हजाराची नोंदणी केली आहे. तरीही आम्ही काँग्रेसला ही जागा द्यायला तयार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.
दोन्ही जागा लढवणार
मराठवाड्यातील नेते सतीश चव्हाण हे काँग्रेसमधून अजित पवार गटात गेले आहेत. त्यामुळे या जागेवर कुणाचा हक्क नसावा. म्हणूनच आम्ही मराठवाड्याची जागा लढणार आहोत. तसेच आम्ही अमरावतीची जागाही लढणार आहोत. एकमत होत नसेल तर आम्ही लढूच. आम्हालाही पक्ष चालवायचा आहे. या निवडणुका वेगळ्या असतात. त्या पंचरंगी आणि बहुरंगी होत असतात. प्रत्येकाला वाटतं आम्ही मोठी नोंदणी केली आहे. त्यामुळे स्वबळावर लढवल्या जातात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
