
आज 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात जरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक ठिकणी आता भाजपला महापौरपदापासून दूर ठेवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अकोल्याच्या महापौर पदासंदर्भात 45 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ रगलं आहे. अकोल्यात भाजपला खोखण्यासाठी आज एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी आमदार साजिद खान आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. बुधवारीच काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव दिला होता. आमच्याकडे जरी 21 नगरसेवक असले तरी देखील आम्हाला कुठलंच पद नको आहे. मात्र सर्वांनी भाजपविरोधात एकत्र यावं असं काँग्रेसने आपल्या या प्रस्तावात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
अकोला महापालिकेमध्ये भाजपचे सर्वाधिक 38 नगरसेवक आहेत, मात्र बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे, त्यामुळे भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यानंतर आता काँग्रेसने देखील शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव दिला असून, सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावं असं म्हटलं आहे. या सर्व पक्षातील नेत्यांनी आता प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे.
अकोला महापालिका
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02