बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स…

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात बकरी ईदच्या दिवशी मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश नाकारल्याने तणाव निर्माण झाला आहे. नमाजसाठी रस्ते अडवणे आणि मंदिर प्रवेशबंदी यामुळे भाजप, शिवसेना ठाकरे गट व हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. प्रशासनावर दबाव आणत शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्यावर जोरदार निदर्शने केली असून, लाल चौकी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

बकरी ईद निमित्त दुर्गाडीवर तणाव, नमाजाला विरोध, ठाकरे-शिंदे गटाने बॅरिकेड्स…
कल्याण दुर्गाडी परिसरात आंदोलन
| Updated on: May 28, 2026 | 8:32 AM

कल्याण शहरातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात तणावाचं वातावरण आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी परिसरातील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेशबंदी आहे. यामुळेच मोठा वाद निर्माण झाला. ईदच्या दिवशी नमाजसाठी रस्ते अडवले जातात आणि मंदिरात प्रवेश दिला जात नाही . या कारणावरून भाजप शिवसेना ठाकरे गट आणि हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनावर दबाव आणत आंदोलनाची हाक दिली.हे आंदोलन तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी परिसर, तसेच कल्याणच्या लाल चौकी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून दुर्गाडीकडे जाणारे तिन्ही रस्ते पोलिसांनी बंद केलेत. तेथे बॅरिकेटिंगही लावण्यात आलं आहे.

गुरुवारी सकाळीच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेही दुर्गाडी परिसरात जमले आणि त्यांनी आंदोलन सुरू झालं,  हे कार्यकर्ते आक्रमक झालेत. काहींनी तर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटिंगवरही चढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं.

नक्की काय घडलं ? 

कल्याणचा दुर्गाडी किल्ला प्रसिद्ध आहे. तेथे किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर आहे, तर पायथ्याशी मुस्लिम धर्मींयाचं धार्मिक स्थळ आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून दोन्ही समाजात वाद सुरू आहे.

बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठणाच्या वेळी हिंदूंना मंदिरात प्रवेश बंदी करण्यावरून मोठा राजकीय वाद दिसून आला. दुर्गाडी परिसरात ईदच्या दिवशी नमाजसाठी रस्ते अडवले जातात आणि मंदिरात प्रवेश दिला जात नाही, असा आरोप आहे.   याच कारणावरून भाजप शिवसेना ठाकरे गट आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी प्रशासनावर दबाव आणत आंदोलनाची हाक दिली.  दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये वातावरण तापलं.

आज सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिली, ते अतिशय आक्रमक झालेले दिसले. तर त्यांच्या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाचेही कार्यकर्ते दुर्गाडी परिसरात आले आणि प्रवेश बंदीच्या मुद्यावरून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी येथे जमल्या, त्यांनी घंटानाद करण्यास सुरूवात केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपचे नगरसेवक ताब्यात

एकीकडे शिवसैनिक आक्रमक झालेले असतानाच दुसरीकडे  भारतीय जनता पक्षानेही दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन केलं. भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुर्गाडी मंदिरात प्रवेश बंदी लागू केल्यामुळे हिंदू संघटनाचं आंदोलन दिसत आहे.

ज्या ठिकाणी दुर्गा देवी मंदिरात जाण्यासाठी हिंदू बांधवाना रोखल जातं नमाज पठणाच्या वेली. मुळात नमाज पठण हे मशिदीत केलं जातं, रोडवर नव्हे. त्यातही हिंदूंना रोखण्यात येतं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या प्रशासनाने, पोलिसांनी ही शिस्त लावली पाहिजे, परंतु विनाकारण  हिंदू बांधवाना अडवलं जातं. आम्ही कधीच कुठल्याही धर्माचा विरोध करत नाही. पण ज्याने त्याने आपला धर्म, आपल्या मंदिरात पाळला पाहिजे, हीच हिंदू म्हणून आमची भूमिका आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

आमच्या मंदिरात देवीच दर्शन घेणं हा आमचा हक्क आहे, तो कोणीच डावलू शकत नाही. याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे, अनेक हिंदू संस्था यात सामील होत असतात. हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हे तर हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे यात कोणी राजकारण आणू नये, असंही आंदोलक म्हणाले.

Follow Us