AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलिव्हरी बॉयची एक चूक अन् अख्खी गोणी...; कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

डिलिव्हरी बॉयची एक चूक अन् अख्खी गोणी…; कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 19, 2026 | 9:51 AM
Share

कल्याणमधील गजबजलेल्या खडकपाडा परिसरात एका खासगी कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयची ६० हजार रुपये किमतीच्या पार्सलची गोणी चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता कल्याणमधील गजबजलेल्या खडकपाडा परिसरात चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने वितरणासाठी ठेवलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या पार्सलची गोणी चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खडकपाडा परिसरात एका खासगी कुरिअर कंपनीत काम करणारा डिलिव्हरी बॉय ग्राहकांना पार्सल पोहोचवण्यासाठी आला होता. त्याने वितरणासाठी आणलेली विविध मौल्यवान पार्सल्स दोन मोठ्या गोण्यांमध्ये भरून नेहमीच्या सुरक्षित ठिकाणी ठेवली होती. या पार्सल्सची एकूण किंमत अंदाजे ६० हजार रुपये इतकी होती.

हा डिलिव्हरी बॉय आपली इतर कामे उरकण्यात किंवा पुढील डिलिव्हरीचे नियोजन करण्यात व्यस्त होता. यावेळी दबा धरून बसलेल्या दोन चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून पार्सलने भरलेली एक मोठी गोणी उचलली. यानंतर त्यांनी तिथून पळ काढला.

CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू

काही वेळाने जेव्हा डिलिव्हरी बॉयला आपली पार्सलची गोणी गायब असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याने तात्काळ परिसरात शोधाशोध केली. मात्र, चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात दोन संशयित चोरटे पार्सल चोरताना स्पष्टपणे दिसून येत आहेत.

या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनावरून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या घटनेमुळे खडकपाडा परिसरातील नागरिक आणि विशेषतः कुरिअर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरी होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Published on: Feb 19, 2026 09:28 AM