Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँकेवर कमळ फुलणार! भाजपची एकहाती सत्तेकडे वाटचाल, मोहिते पाटलांना धक्का
सोलापूर जिल्हा बँकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा बँकेच्या 19 पैकी 10 जागेवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.

सागर सुरवसे, प्रतिनिधी: Solapur DCC Bank Election: एकीकडे जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले असून सत्ता मिळवण्याकडे घौडदौड सुरु केली आहे. आत्तापर्यंत जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या 21 जागांपैकी 12 जागा महायुतीने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. अशातच आता सोलापूर जिल्हा बँकेवरही भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येणार असल्याचं चित्र दिसत आहे.
सोलापूर जिल्हा बँकेवरही भाजपची एकहाती सत्ता येणार!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्हा बँकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा बँकेच्या 19 पैकी 10 जागेवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये भाजप प्रणित आघाडीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, यशवंत शिंदे, विक्रांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, अजिंक्यराणा पाटील, सिद्धेश्वर आवताडे, शंभूराजे जगताप यांचा समावेश आहे.
या विजयी घौडदौडीबाबत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सक्षम उमेदवार देणे हा क्रायटेरिया लावला होता. ही निवडणूक लागायला नको होती मात्र ती लागली. मी आणि राजन पाटील यांनी बिनविरोध करण्यासाठी मोहिते पाटलांशी चर्चा केली होती मात्र दुर्दैवाने ते झालं नाही, मोहिते पाटलांनी अवास्तव जागा मागितल्या ज्यामुळे निवडणूक लागली, असं ते प्रशांत परिचारक म्हणाले. तसेच अध्यक्ष पदासाठी कोणतीही चर्चा नाही आमचा पक्ष ठरवेल तो अध्यक्ष असेल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
‘मोहिते पाटलांमुळेच निवडणूक लागली..’
“विरोधकांनी अवास्तव जागा मागितल्याने बिनविरोध झाली नाही. विरोधकांनी विचार करुन जागा मागायला हवी होती,” असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार राजन पाटील यांनी नाव न घेता निवडणूक लागण्याला मोहिते पाटलांवर खापर फोडले. दरम्यान, निवडणुकीत माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज बाद झाला होता, तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांनीही अर्ज मागे घेतल्याने ट्वीस्ट निर्माण झाला होता. मात्र आता भाजपने या निवडणुकीत बाजी मारल्याचे दिसत आहे.
