आधी घरगुती सामान, मग रिकामे बॉक्स अन् त्यानंतर सापडलं असं काही की अधिकारीही चक्रावले, भिवंडीत मोठी कारवाई

कल्याण राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने भिवंडी बायपासवर मोठी कारवाई करत गोव्याहून येणारा १ कोटी रुपयांचा बेकायदेशीर विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. आगामी निवडणुका आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली.

आधी घरगुती सामान, मग रिकामे बॉक्स अन् त्यानंतर सापडलं असं काही की अधिकारीही चक्रावले, भिवंडीत मोठी कारवाई
फोटो - प्रातनिधिक
| Updated on: Dec 18, 2025 | 1:35 PM

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसरीकडे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची जोरदार तयारी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. कल्याण उत्पादन शुल्क भरारी पथकाने भिवंडी बायपासवर एका मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या आणलेला विदेशी दारूचा कंटेनर जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १ कोटी ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराज्यीय मद्यतस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सापळा कसा रचला?

महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात दारुचा कमी कर असल्याने तिथून मोठ्या प्रमाणात अवैध दारु तस्करी केली जाते. कल्याण भरारी पथकाला गोपनीय सूत्रांकडून याबद्दलची माहिती मिळाली होती. एका मोठ्या कंटेनरमधून विदेशी मद्याची मोठा साठा भिवंडी बायपासमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भिवंडी बायपास परिसरात मोक्याच्या ठिकाणी पाळत ठेवली.

त्यावेळी त्यांना एक सहा चाकी कंटेनर (MH 04 G 4411) भिवंडी बायपास मार्गे मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने जात अशी माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे, पथकाने गुरुवारी पहाटेपासूनच भिवंडी बायपास रोडवर मोक्याच्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. हा संशयास्पद कंटेनर दिसताच पथकाने त्याला थांबवण्याचा इशारा केला. सुरुवातीला चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पथकाने शिताफीने कंटेनर अडवला.

१ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त

या कंटेनरची झडती घेतली असता सुरुवातीला त्यात काही घरगुती वस्तू आणि रिकामे बॉक्स दिसले. मात्र त्यानंतर अधिक सखोल तपासणी केली असता आतमध्ये विदेशी मद्याचे तब्बल ७११ बॉक्स अत्यंत चलाखीने लपवून ठेवल्याचे उघड झाले. याची दारुची किंमत अंदाजे ७० लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ३० लाख रुपयांचा कंटेनर आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे. यामुळे या कारवाईत सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

यावेळी कंटनेर चालक आसिफ खान याला अटक करण्यात आली. त्याच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणुकांच्या काळात आणि ३१ डिसेंबरसाठी मद्याची मागणी वाढते, याचा फायदा घेऊन गोव्यातील स्वस्त दराची दारू महाराष्ट्रात चढ्या दराने विकण्याचा हा डाव होता. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून ही तस्करी केली जात होती, अशी माहिती आसिफ खान यांनी पोलिसांना दिली. आता या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि हा साठा कोणाला पुरवला जाणार होता, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.