
कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने कर्नाटक- महाराष्ट्र एसटी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
बेळगावात आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. सुवर्ण सौधा येथे हा महामेळावा होणार होता. पण मेळाव्याला जातानाच एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या महामेळाव्याला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला असून त्याचे लोण महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.
बसेस बंद
बेळगाव अधिवेशनादरम्यान गोंधळाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे राज्यात दगडफेकीसारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यात एसटी बस सर्वाधिक टार्गेट होण्याची शक्यता असल्याने कर्नाटक ते महाराष्ट्र बस सेवाच तात्पुरती बंद करण्यात आली आहे. बेळगाव, निपाणी बस डेपोतून महाराष्ट्रात जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहे.
ठाकरे गट आक्रमक
कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोल्हापुरात ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात निदर्शन केली आहेत. ठाकरे गटाने कर्नाटकच्या बस रोखून आपला निषेध नोंदवला आहे. ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आंदोलन सुरू आहे. कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या आज बेळगावमध्ये होणाऱ्या मेळाव्याला परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
या नेत्यांना अटक
माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नेते आर. एम. चौगुले, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, रेणू किल्लेकर, सतीश पाटील यांसह अनेकांना पोलिसांनी सकाळपासूनच अडवून जबरदस्तीने अटक करण्याचे सत्र सुरू केले. मेळाव्यापर्यंत पोहोचू न देण्याच्या कर्नाटक सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में!”, “अन्याय झाला तर आंदोलन करू!” अशा जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला.
पोलिसांनी व्हॅक्सीन डेपो परिसराला चारही बाजूंनी घेराव घालत मेळावा यशस्वी होऊ न देण्याचे प्रयत्न केले. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते ठामपणे मेळाव्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणावर अटक मोहीम सुरूच राहिली.
एसटी बंद, सुरक्षा वाढवली
कोल्हापुरात कर्नाटकच्या बसवर एमईएसचा निषेध नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात जाणारी केएसआरटीसी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी बस स्थानकापर्यंतच वाहतूक सुरू होत्या. आता निपाणी बस स्थानकावर केएसआरटीसी बसेस थांबल्या आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीमुळे बस वाहतूक बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
कर्नाटक नवनिर्माण सेनेचं आकांडतांडव
कर्नाटक नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी बेळगावाच्या अथनी शहरात महाराष्ट्रातील बस थांबवून निषेध केला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेना श्री रामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बस थांबवून निषेध नोंदवला आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना नेत्यांनी कर्नाटक परिवहन बस थांबवली होती. कर्नाटक बस थांबवल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक नवनिर्माण सेनेनेही संताप व्यक्त केला आहे.
कन्नड वेदिकेचा उद्दामपणा
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा उदामपणा सुरूच आहे. कर्नाटकातील अथनी येतील एसटीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जय कर्नाटक लिहिल्याने वाद चिघळला आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र लिहिल्याने अथनीत त्याचे पडसाद उमटले आहेत.
ठळक घटना…
>> महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा रोखण्याचा प्रयत्न, नेते-कार्यकर्त्यांची सकाळपासून धरपकड
>> “रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में!” घोषणांनी बेळगाव दणाणलं, पोलिसांकडून मोठी अटक मोहीम
>> व्हॅक्सीन डेपोला कडेकोट बंदोबस्त, कर्नाटक पोलिसांकडून मेळाव्याला जाणाऱ्यांवर कारवाई
>> माजी आमदार किनेकर, माजी महापौर अष्टेकरांसह अनेक नेत्यांना अटक, कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध
>> महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा थांबवण्यासाठी पोलिसांची धडाडी, तरीही कार्यकर्त्यांचा हट्ट कायम