केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा करुण अंत, नेमकं काय घडलं?

उत्तराखंडमधील केदारनाथजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. खराब हवामान हा अपघाताचे कारण असण्याची शक्यता आहे.

केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा करुण अंत, नेमकं काय घडलं?
kedarnath helicopter crash
| Updated on: Jun 15, 2025 | 11:39 AM

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे. राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल अशी या मृतांची नावे आहेत. हे सर्वजण यवतमाळ जिल्ह्यातील वणीतील रहिवाशी आहेत.

केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात पायलटसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल असे मृतांमधील व्यक्तींची नावे आहेत. या घटनेने वणी शहरावर शोककळा पसरली आहे. सुदैवाने या कुटुंबातील विवान नावाचा मुलगा पांढरकवडा येथील आजी-आजोबांकडे असल्याने बचावला आहे.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी साधारण ५:३० च्या सुमारास उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचे एक हेलिकॉप्टर गरुडचट्टीजवळ कोसळले. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर गौरीकुंड परिसरातून मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. गवत कापणाऱ्या महिलांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली.

माहिती मिळताच, एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबत ५ प्रौढ आणि २ लहान मुले प्रवास करत होते, ज्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष विखुरलेले पडले आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन, इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह धामी म्हणाले.