देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्काराचा मार्ग मोकळा होणार? हायकोर्टाने घेतला मोठा निर्णय

High Court Takes Up Khashaba Jadhav Padma Award Plea: ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. 25 वर्षांच्या लढ्याची हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे.

देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्काराचा मार्ग मोकळा होणार? हायकोर्टाने घेतला मोठा निर्णय
Khashaba Jadhav's Posthumous Padma Award
| Updated on: Nov 21, 2026 | 7:18 PM

स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू आणि महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यांच्या पुरस्कारासाठी सुरू असलेल्या प्रदीर्घ लढ्याची अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना केंद्र आणि राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनी ही माहिती दिली. भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्याचा ऐतिहासिक पराक्रम खाशाबा जाधव यांनी केला होता. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रीडा इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.

Loading...

मात्र देशासाठी एवढी मोठी कामगिरी करूनही त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सन्मानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनी वडिलांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी गेल्या अडीच दशकांपासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केले. विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीवर ठोस निर्णय झाला नव्हता. त्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला.

रणजीत जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वडिलांच्या योगदानाचा योग्य सन्मान करण्याची मागणी केली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी कोल्हापूर सर्किट बेंचने केंद्र आणि राज्य सरकारला या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याची माहिती रणजीत जाधव यांनी दिली. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळण्याच्या मागणीला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर सरकार नेमकी काय भूमिका घेते आणि पुरस्काराबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या एका ऑलिम्पिकवीराच्या सन्मानासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी तब्बल 25 वर्षे दिलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार कधी मिळणार, याची प्रतीक्षा क्रीडाप्रेमी आणि महाराष्ट्रातील जनतेला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us