Khed Nagar Parishad election Result 2025 : एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याची कमाल, नगर परिषदेत 21 पैकी 21 जागा जिंकल्या

Khed Nagar Parishad election Result 2025 : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरीतही मोठी कमाल केली आहे. जाणून घ्या इथला निकाल.

Khed Nagar Parishad election Result 2025 : एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याची कमाल, नगर परिषदेत 21 पैकी 21 जागा जिंकल्या
Eknath Shinde
| Updated on: Dec 21, 2025 | 1:53 PM

कोकणातून येणारे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी खूप उत्साहवर्धक आहेत. मालवण, कणकवलीत शिवसेनेच्या उमेदवारांनी मैदान मारलं आहे. सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही अशीच स्थिती आहे. निलेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, तर रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम यांची ताकद आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलय. उदय सामंत आणि योगेश कदम दोघे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मध्यंतरी खूप गंभीर आरोप केले होते.

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा ऐतिहासिक व एकतर्फी विजय मिळवला आहे. एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निकालात महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निकाल जाहीर होताच महायुतीने 21-0 असा क्लीन स्वीप करत विरोधकांना नामोहरम केलं. या निकालात महाविकास आघाडीला खातही उघडता आलं नाही.

खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणार

या घवघवीत विजयामुळे माधवी भुटाला या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 17 उमेदवार विजयी तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. 21-0 हा निकाल खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणारा असून, महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास दर्शवतो.

नाशिक मध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ

नाशिक जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागांचा निकाल हाती. नाशिक मध्ये शिंदे यांची शिवसेना ठरला सर्वात मोठा पक्ष. 11 पैकी तब्बल 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांचा विजय. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश. नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडासाफ. 11 पैकी एकही नगराध्यक्ष पदाची जागा राखता न आल्याने महाविकास आघाडीचा नाशिक मध्ये सुपडा साफ.