
मुंबईच्या महापाैर रितू तावडे या गाडीवर लावलेल्या लाल दिव्यामुळे टिकेच्या धनी ठरत आहेत. गाडीवर लाल दिवा लावण्याची परवानगी नसतानाही त्यांनी लाल दिवा लावल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबद्दल बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर थेट टीका केली. महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे काढण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. नियमांचे पालन करत हे दिवे हटवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढे बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, 2017 ला यावर फार मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर अश्या गाडीवर लाल निळे दिवे लावले जाऊ नयेत असा नियम झाला.
मी सुद्धा महापौर राहिलेली आहे, मला जे नियम सांगण्यात आलेले होते त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते. मी महापौर असताना फैमिलीसाठी असणारी गाडी मी नाकारली होती आणि तेच मानधन मुंबईकरांसाठी दिले. प्रोटोकॉल विचारून महापौरांनी माहिती घेतली नाही का? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही दिव्याची गाडी वापरली? मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या बदल्यांचे आदेश काढण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का? असेही प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केले.
पुढे बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, तुम्ही म्हणताय आधीच्या महापौर कधीच दिसल्या नाहीत? तुम्हाला काम करणाऱ्या महापौर कश्या दिसतील. मी महापौर असताना कधीही मुंबईच्या बाहेर गाडी नेली नव्हती.मी महापौर झाल्यानंतर फक्त एकदाच माझ्या कुलदैवतेला गाडी घेऊन गेली होती ती माझी भावना होती.
मी कधीही लाल दिव्याचा मोह केला नाही महापौरांनाही तो टाळता आला असता, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या महापाैर रितू तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. आता रितू तावडे यांच्यावर लाल दिव्याच्या गाडीवरून टीका होत असतानाच यावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे भाष्य केले.