CJP News: कॉकरोच जनता पार्टीला पाक- अमेरिकेतून फंडिंग? CJP नेत्यांनी भाजप नेत्यालाच सुनावलं
अभिजीत दीपके यांना अमेरिकन देणगीदारांकडून निधी मिळत असल्याचा तर पक्षाचे सह-संस्थापक आशुतोष रांका यांना सरकारविरोधी मोहिमा चालवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तानी राजकारणी व इतर सूत्रधारांकडून पैसे मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता

Cockroach Janata Party Forgein Funding Allegations: भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टीला विदेशातून फंडिग मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता.सीजेपीला पाकिस्तान तसेच अमेरिकेकडून निधी मिळत होता असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. मंत्री जितेंद्र सिंह यांच्या या आरोपांना आता सीजेपी पक्षाचे संयोजक तथा प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आशुतोष रांका- सौरभ दास?
गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची चौकशी झाली. या चौकशीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना जितेंद्र सिंह यांच्या टिकेला उत्तर दिले. “जर आम्हाला परदेशातून निधी मिळत होता तर नीट पेपरफुटीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान त्यांनी आमच्याशी हस्तांदोलन करून आमच्यासोबत का बसले? असा थेट सवाल त्यांनी केला. आम्हाला परदेशी निधी मिळत होता, तर ते आमच्याशी हस्तांदोलन का करत होते, आमच्याशी का बोलत होते, आमच्यासोबत चहा का पीत होते आणि आम्हाला नाश्ता का देत होते? याची उत्तरे त्यांनाच विचारायला पाहिजेत,” असं आशुतोष रांका म्हणाले.
रांका यांच्यासोबत पोलीस चौकशीला उपस्थित असलेल्या सौरभ दास यांनीही परदेशी निधीच्या आरोपांचे खंडन केले आणि कोणताही पुरावा सादर केला नसल्याचे सांगितले. “हा एक निराधार आरोप आहे. आम्ही पहिल्या दिवसापासूनच आधाराची मागणी करत आहोत. 6 जून रोजीच्या पहिल्या आंदोलनापूर्वीच या चळवळीविरोधात कसा नकारात्मक प्रचार केला जात होता, हे तुम्ही पाहिलेच आहे. आम्ही 3 जून रोजी पहिली पत्रकार परिषद घेतली, तेव्हापासून आम्ही विचारत आहोत की तुमच्या कथित आरोपांचे पुरावे मागत आहोत, मात्र अद्याप कोणतेही पुरावे दिले नाहीत. आता एक वरिष्ठ सरकारी मंत्री हेच खोटे प्रचार पुन्हा करत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे,” असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते जितेंद्र सिंह?
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी ‘कॉकरोच जनता पार्टीचे’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “अभिजीत दीपके यांना अमेरिकन देणगीदारांकडून निधी मिळत असल्याचा तर पक्षाचे सह-संस्थापक आशुतोष रांका यांना सरकारविरोधी मोहिमा चालवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तानी राजकारणी व इतर सूत्रधारांकडून पैसे मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. देशात अराजकता पसरवणाऱ्या या घटकांना भारत आणि भारताबाहेर कार्यरत असलेल्या अनधिकृत स्रोतांकडून आणि भारतविरोधी स्वयंसेवी संस्थांकडून निधी मिळत असल्याचे पुरेसे पुरावे आहेत,” असं ते म्हणाले होते.
दिल्ली पोलिसांकडून चौकशी!
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची चौकशी केली. 13 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात ही एक नियमित चौकशी होती असं त्यांनी सांगितले. तसेच आम्ही कोणत्याही तपासाला पूर्णपणे सहकार्य सहकार्य करु असे म्हणत त्यांनी सर्व प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
