Kolhapur News : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात राडा; पोलीस आणि चप्पल स्टँड चालकांमध्ये बाचाबाची

Ambabai Mandir Rada Video : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात राडा झाला आहे. मंदिर परिसरात असलेल्या चप्पल स्टँडला काढण्यावरून हा राडा झाला आहे. पोलीस आणि चप्पल स्टँड धारकांमध्ये बाचाबाची झाली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. वाचा सविस्तर...

Kolhapur News : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात राडा; पोलीस आणि चप्पल स्टँड चालकांमध्ये बाचाबाची
Image Credit source: TV9
| Updated on: Oct 10, 2023 | 12:44 PM

भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 10 ऑक्टोबर 2023 : कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल काढण्यावरून राडा झाला आहे. पोलीस आणि चप्पल स्टँड चालकांमध्ये झटापट झाली आहे. हे चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचं म्हणत प्रशासनाकडून या चप्पल स्टँड चालकांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस ही कारवाई करत आहेत. मात्र आम्हाला नोटीसवर दिलेल्या वेळेच्या आधी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप चप्पल स्टँड चालक करत आहेत.

पोलिसांकडून कोल्हापूर मंदिर परिसरात असलेल्या चप्पल स्टँड चालकांना ताब्यात घेतलं जात आहे. कोल्हापूर मंदिरात जेव्हा भाविक येतात. तेव्हा आपल्या चपला या चप्पल स्टँडमध्ये ठेवतात. यामुळे चप्पल स्टँडधारकांना रोजगार मिळतो. 50-60 कुटुंबाचा उदरनिर्वाह या चप्पल स्टँडवर अवलंबून आहे. मात्र हे सगळे चप्पल स्टँड अनधिकृत असल्याचं म्हणत महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. या चप्पल स्टँडवर बुलडोझर चालवला जात आहे. ही कारवाई कायदेशीर पद्धतीने केली गेल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. तर यावेळी आमच्यावर अन्याय होतोय. आम्ही न्यायलयात गेलो आहोत. मात्र मुदतीआधीच आमच्यावर कारवाई केली जात आहे, असा आरोप चप्पल स्टँड चालक करत आहेत.

महिलांचा आक्रोश

महिला चप्पल स्टँड चालकांना पोलिस ताब्यात घेत आहेत. यावेळी या महिलांकडून आक्रोश केला जातोय. आमचं भविष्य अंधारात आहे. पुढचं आम्हाला काहीही कळत नाहीये. या लोकांनी जरी आमचे स्टँड पाडले. तरी आम्ही परत आमचे स्टँड लावू. नाहीतर इथेच आम्ही जीव देऊ, असं या महिला सांगत आहेत. या लोकांनी लाच खाल्ली असेल. त्यामुळे आमच्यावर कारवाई केली जातेय. इथं खूप अतिक्रमण आहेत. मग आमच्यावरच कारवाई का?, असा सवाल या महिलांनी उपस्थित केलाय.

आम्हाला कोणतीही नोटीस दिलेली नाही. आम्ही दोन दिवसांची मुदत मागितली होती. आम्ही न्यायालयात गेलोय. आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यांना आम्ही विनंती केली ही तुम्ही दोन तास द्या. न्यायालय काय म्हणतं ते बघू. मग हवं तर आमच्यावर कारवाई करा, असं सांगितलं. पण या लोकांनी आमचं ऐकलं नाही.आम्हाला मारहाण केली. लोळवून लोळवून मारलं, असं या महिलांनी यावेळी सांगितलं.