कोल्हापूरच्या वाट्याला तीन मंत्रिपदं जवळपास निश्चित, शिवसेनाही अनुशेष भरुन काढणार?

यंदा कोल्हापूर जिल्ह्याचा (Cabinet Expansion Kolhapur) मंत्रिपदाचा अनुशेष भरुन निघणार असं दिसतंय. कारण तीनही पक्षाकडून प्रत्येकी एक मंत्रिपद कोल्हापूर जिल्ह्याला मिळण्याची चिन्हं आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:49 PM, 24 Dec 2019
कोल्हापूरच्या वाट्याला तीन मंत्रिपदं जवळपास निश्चित, शिवसेनाही अनुशेष भरुन काढणार?

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप दिल्लीत खलबतं सुरु असल्याने मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचं हे अद्याप ठरलेलं नाही. असं असलं तरी यंदा कोल्हापूर जिल्ह्याचा (Cabinet Expansion Kolhapur) मंत्रिपदाचा अनुशेष भरुन निघणार असं दिसतंय. कारण तीनही पक्षाकडून प्रत्येकी एक मंत्रिपद कोल्हापूर जिल्ह्याला मिळण्याची चिन्हं आहेत. (Cabinet Expansion Kolhapur)

कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ ही नावं जवळपास निश्चित आहेत. तर शिवसेनेलाहा यंदा कोल्हापूरकडे मंत्रिपद देण्याशिवाय पर्याय नाही. कारण शिवसेनेचे दोन खासदार आणि 6 आमदार असलेल्या कोल्हापूरमध्ये यंदा पक्षाला मोठा फटका बसला. सेनेचे 6 पैकी 5 आमदार पराभूत झाले.

 सतेज पाटील (काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार)

काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार असलेले सतेज पाटील हे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांच्याही जवळचे आहेत. आघाडी सरकारच्या काळात सतेज पाटील यांनी गृहराज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. मंत्रिपदाचा त्यांना अनुभव आहे.

यंदाच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषत: कोल्हापुरात काँग्रेसने जी मुसंडी मारली, त्यामध्ये सतेज पाटील यांचं मोठं योगदान आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जिथे काँग्रेसचा एकही आमदार नव्हता, तिथे यंदा तब्बल 4 आमदार निवडून आले. सतेज पाटलांनी पुतण्या ऋतुराज पाटीलला निवडून आणलंच, पण काँग्रेसने अन्य तीन मतदारसंघातही बाजी मारली.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार होते, त्यापैकी 5 आमदार पराभूत झाले. आघाडीची व्यूहरचना आखण्यात सतेज पाटलांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे सतेज पाटील हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

 हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)

राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना जाणता मुस्लिम चेहरा म्हणून हसन मुश्रीफांची ओळख आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बळकटी देण्यात मुश्रीफांची महत्त्वाची भूमिका आहे. शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.

आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहे. प्रशासनाच्या कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे हसन मुश्रीफांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे.

 प्रकाश आबिटकर (शिवसेना आमदार)

प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. ते दोन्हीही शिवसेनेचे आहेत. तर विधानसभेचे 6 आमदार होते. मात्र शिवसेनेने एकही मंत्रिपद कोल्हापूरला दिलं नाही.

त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये शिवसेनेला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. गेल्या विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार असताना, त्यावेळी एकाही आमदाराची मंत्रिपदी वर्णी न लागल्यामुळे स्थानिक पातळीवर प्रचंड नाराजी होती. यंदा त्याची भरपाई केली जाण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यातून प्रकाश आबिटकर हे एकमेव आमदार निवडून आले आहेत. त्यांची मंत्रिपदी वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या  

Kolhapur district Assembly results | कोल्हापूर जिल्हा विधानसभा निकाल