
ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड : बीडमधील प्रकरणावरून घेरल्यानंतर कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. तांदळे यांच्यावर जे जे आरोप करण्यात आले आणि आतापर्यंत जे जे घडलं त्यावर बालाजी तांदळे यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. आपण पोलिसांवर कसा दबाव टाकू शकतो? मी काय प्रशासनाचा जावई आहे का? असे सवाल करतानाच मी जर या संपूर्ण प्रकरणात आरोपी असेल तर माझ्यावर कारवाई करा. मला आरोपी करा. पण पुरावे नसताना आणि माझा दोष काहीच नसताना उठसूट सहआरोपी करण्याची मागणी करू नका, असं बालाजी तांदळे यांनी म्हटलं आहे.
आरोपीशी संपर्क आहे का? असा बालाजी तांदळे यांना करण्यात आला. त्यावर, माझा आरोपीची संपर्क असता तर मी आरोपी शोधून देण्यात मदत केली असती का?, असा सवाल बालाजी तांदळे यांनी केला. धनंजय मुंडे माझे दैवत आहेत. वाल्मिक कराड माझे नेते आहेत. विष्णू चाटे आणि माझे संबंध होते म्हणून तुम्ही सगळा समाज दुश्मन करणार का? सीआयडी ऑफिसमध्ये माझी चौकशी झाली. मी चौकशी करून आलो. 300 पोलीस असताना मी दाब कसा टाकू शकतो? इतकी दु:खद घटना घडली, त्या घटनेत मी दबाव टाकू शकतो का? असा सवाल बालाजी तांदळे यांनी केला आहे.
आम्ही त्यांचे जावई आहोत का?
तुम्ही आरोपीचा फोटो दाखवून धमकावलं? असा आरोप आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता विषय कसा आहे, तुम्ही काही जरी बोलले तरी तुमचं खरं आहे आणि आम्ही खरं तरी बोललो तरी आमचं खोटं आहे. असं लोक समजतात. आमचं विकत नाहीत, विकतय तुमचं खोटं बोलला तरी. याला आरोपी करा, त्याला आरोपी करा, तुम्ही आरोपी किती करणार आहात? आम्ही जर चुकीचं वागत असलो तर आम्हाला शंभर टक्के आरोपी करा. आम्ही दोषी असेल तर पोलिसांनी येऊन आम्हाला अटक करावी. पुरावा असेल तर प्रशासन आम्हाला सोडणार आहे का? आम्ही त्यांचे जावई आहोत का?, असा सवाल त्यांनी केला.
चादरी खरेदी केल्या
आरोपींना चादर खरेदी करून दिल्याचाही आरोप आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. मी चादर घेतल्या हे मान्य करतो, मी चादर घेतल्यातच. मला लेकरबाळं प्रपंच काही नाही का? गेवराई पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही नाहीत का? मला अचानक फोन आला. येताना रग घेऊन या. मी रग घेऊन आलो. मी चादरी घरी आणल्या. वाटलं तर घरी चला मी चादर दाखवतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधच नाही
कृष्ण आंधळे आणि तुमची ओळख आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. कृष्ण आंधळे आणि माझा कुठेही अर्थाअर्थी संबंध नाही, असता तर मी सांगितलं असतं. तो मैंदवाडी म्हणजे माजलगाव मतदारसंघातील आहे, केज मतदार संघातील नाही, असं तांदळे म्हणाले.
चर्चा करून परत आलो
पवनचक्की वादप्रकारात घटनास्थळी होता का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मारहाण झाल्यानंतर मी सांगवीला चाललो होतो. अचानक मला त्या ठिकाणी गर्दी दिसली. सगळं प्रकरण संपल्यानंतर मी तिथे गेलो होतो. संतोष देशमुख यांच्यासोबत 15-20 मिनिटे चर्चा करून परत आलो, अशी माहिती दिली.
मी काही नातेवाईक नाही
सहआरोपी करण्याच्या मागणीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. कुणी आरोपी करा म्हटल्यावर आरोपी होत नाही. हा प्रशासकीय कार्यवाहीचा भाग आहे. मी जर दोषी असेल तर कारवाई आहे. मी काही प्रशासनाचा जावई नाही किंवा नातेवाईक नाही. काही मीडियावाल्यांनी मला आरोपी म्हणून टीव्हीवर पाठीमागे दाखवल आहे. आरोपी बालाजी तांदळे म्हणून मला दाखवलं आहे. मीडियावाले न्याय देवता असल्यासारखे वागत आहेत. डायरेक्ट तुम्ही आम्हाला आरोपी करत आहात. आमच्यावर गुन्हे दाखल झाले असेल तर तुम्ही आम्हाला आरोपी करा, असं त्यांनी सांगितलं.
त्या सीसीटीव्हीत असेल तर…
वाशीतील सीसीटीव्ही फुटेजवरही त्यांनी सांगितलं. वाशीमध्ये जर माझं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असेल, त्यात मी असेल किंवा वाल्मिक कराड माझ्यासोबत असेल तर तुम्ही म्हणताल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असा आव्हानच त्यांनी दिलं.
हे चुकीचं होणार नाही का?
या घटनेच्या आगोदर माझे वाल्मिक कराडशी संबंध होते. ते माझे नेते आहेत. माझ्या नेत्यासोबत मी राहणार नाही का? धनंजय मुंडे आणि वाल्मिक अण्णांचे राज्यात कार्यकर्ते आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांना आरोपी करणार आहात का तुम्ही? असा सवाल करतानाच दिसला कार्यकर्ता तर आरोपी कसं करता येईल? हे चुकीचं होणार नाही का?, असा सवालही त्यांनी केला.
आरोपी पकडताना मी होतो
कोणत्या आरोपी अटक करताना तुम्ही पोलिसांसोबत होते, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी थेट माहिती दिली. सर्व आरोपींना अटक करताना मी सोबत होतो. फक्त प्रतिक घुलेंना अटक करताना मी नव्हतो. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांना सोडता इतर सर्व आरोपींना पकडताना मी होतो, असं त्यांनी सांगितलं.
ओपन चॅलेंज आहे
तुम्ही आरोपींची जामीन घेतल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप आहे. असं विचारताच त्यांनी आक्रमक उत्तर दिलं. आज पण माझं ओपन चॅलेंज आहे, मी जर आरोपीचा जामीन घेतला असेल तर मला नंबर एकचा आरोपी करा. तुम्ही कोर्टात जा. कोर्टातली पत्र द्या आणि जामीन कोणी घेतली ते बघा. बालाजी तांदळेने जामीन घेतला असेल तर नंबर एकचा आरोपी मला करा. ओपन चॅलेंज आहे माझं, असंही ते म्हणाले.
100 टक्के मदत करणार
पोलिसांना अजूनही मदत करणार आहात का? या प्रश्नावर त्यांनी होय असं उत्तर दिलं. गरज पडली तर मी 100% मदत करणार आहे. आपण पोलिसांना मदत करणं चुकीचं आहे का ? पोलीस प्रशासनाने सांगितलं तर मी शेवटपर्यंत सुद्धा मदत करायला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.