उदयनराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून हाके आक्रमक; म्हणाले एका खासदाराने..

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे, त्यावर आता लक्ष्मण हाके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

उदयनराजेंच्या त्या वक्तव्यावरून हाके आक्रमक; म्हणाले एका खासदाराने..
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2025 | 4:01 PM

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. प्रतापसिंह महाराज यांनी आपल्याच राजवाड्यामध्ये स्त्रींयासाठी पहिली शाळा सुरू केली होती. ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण देखील तिथेच झालं असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. दरम्यान उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेलती आहे.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके? 

महाराष्ट्रातील जनतेचं आणि छत्रपती या शब्दाचं एक वेगळं नातं आहे,  पण कुठलाही अभ्यास न करता, इतिहासकार यांचा सल्ला न घेता अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य एका खासदाराने करू नयेत, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असताना त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्येच असं कसं बेजबाबदारपणे वागू शकतात? असा सवालही यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

दरम्यान वाघ्या कुत्र्याची समाधी काढून फेकून द्या, असंही उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्यावरून देखील लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे यांना सुनावलं आहे. तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सातबारा आला का? मुख्यमंत्र्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का?  तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असे काही आहे का? असा सवाल यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.   उदयनराजेंचे आजचे वक्तव्य म्हणजे या महाराष्ट्राच्या समाज मनाचा अपमान आहे, त्यामुळे उदयनराजेंनी खासदारकीच्या पदाला शोभेल असे वक्तव्य करावे, असा सल्लाही यावेळी हाके यांनी दिला आहे.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं, असं उदययन राजे यांनी म्हटलं आहे, यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.