एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाजूला ठेवलेला शायना एनसी यांचा फोन गायब, थेट पोलिसात तक्रार, बाप्पाच्या दर्शनासाठी..
Eknath Shinde Nandanvan : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. थेट एका बड्या महिला नेत्याचा फोन एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाहून काही मिनिटात गायब झाला. याबाबत आता मोठी माहिती पुढे येतंय.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी धक्कादायक घटना घडली. चक्क दोन मिनिटे हातातून बाजूला ठेवलेला मोबाईल गायब झाला. ज्याने एकच खळबळ उडाली. राज्यातील बड्या महिला नेत्याचा फोन शिंदेंच्या घरातून गायब झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगल्यावर 17 सप्टेंबर रोजी गणपती दर्शनावेळी हा प्रकार घडला. एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगल्यावर 17 सप्टेंबर रोजी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी पोहोचल्या होत्या. यावेळी नंदनवन बंगल्यावर राज्यातील इतरही बडे नेते गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. मंत्री देखील उपस्थित होते. सर्वांमध्ये विविध गप्पा सुरू होत्या. मोठी लगबग शिंदेंच्या बंगल्यावर सुरू होती.
यादरम्यान शायना एनसी यांनी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी काही मिनिटांसाठी आपला मोबाईल बाजूला ठेवला. मात्र, दर्शन झाल्यानंतर त्यांनी आपला मोबाईल बघितला तर गायब झाला. त्यांनी काही वेळ आपला मोबाईल शोधला पण त्यांना सापडला नाही. शायना एनसी यांचा मोबाईल सापडत नसल्याने एकच गोंधळ उडाला. जवळपास सर्वजण मोबाईल शोधण्याच्या कामाला लागले.
त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी मोबाईल चोरीची तक्रार थेट पोलिसात दाखल करण्यात आली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. पोलिस तपासात हा मोबाईल नंदनवन येथे कर्मचाऱ्याकडे मिळून आला. नजरचुकीने हा मोबाईल आपल्याकडे आल्याची कबुली कर्मचाऱ्याने दिली.
तसेच आपण तो मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द करण्यासाठी जात असल्याची माहिती देखील त्या कर्मचाऱ्याने दिली. पोलिसांना चौकशीत विसंगती आढळून आली नाही. संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई न करता दाखल गुन्ह्यांबाबत न्यायालयात स्पष्टीकरण दिले. यावेळी न्यायालयाने संबंधित मोबाईल शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत शायना एनसी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी घटनेला दुजोरा दिला. मात्र, संबंधित मोबाईल अद्याप आपल्याकडे पोलिसांनी सुपूर्द केला नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानातील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले होते.
