डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मोठा धक्का, 48 तासाचा वेळ, थेट कायदेशीर..
पुण्यातील डीजे बंदीचा विषय तूफान चर्चेत आहे. अनेकजण डीजेविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. विद्यानंद बापट यांनी डीजेबंदीचा मुद्दा पुढे आणला. आता त्यांना मोठा धक्का बसला.

पुण्यातील गणपती उत्सवात डीजेवर बंदी आणली पाहिजे, याकरिता विद्यानंद बापट मोठा लढा देत आहेत. पुणेकर त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. हेच नाही तर tv9 मराठीला मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांना मारहाण देखील झाली. पुण्यात डीजेला जोरदार विरोध केला जात आहे. 72 तास मिरवणुका सुरू असतात. सतत डीजे वाजतो. राजकीय नेत्यांची मते डीजे बंदीबाबत वेगवेगळी आहेत. जवळपास नेत्यांचे म्हणणे आहे की, पारंपारिक वाद्य वाजूनही सण साजरी केली जाऊ शकतात. कशाला गोंगाट पाहिजे. डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना आता मोठा धक्का बसला. गेल्या काही दिवसांपासून धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.
बापट यांनी नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच नमूद वेळेत समाधानकारक खुलासा न झाल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यातील गणेश उत्सवात वाजले जाणारे डीजे साउंड सिस्टिम विरोधात विद्यानंद बापट भूमिका मांडत आहेत. बापट यांची मुलाखत आणि त्यातील काही मुद्दे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा झाले आहेत. दरम्यान, गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी केलेली वक्तव्ये अवमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचा दावा नोटिस द्वारे करण्यात आला आहे.
ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पिकर, मिरवणुका अथवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला विरोध नसल्याचे ॲड. नाईक यांनी त्यांच्या याचिकेत स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका नोटीसमधून स्पष्ट करण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, असे सुद्धा या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.