वीज गेली, बिबट्यानं अंधाराचा फायदा घेतला अन्…; दोन वर्षांच्या चिमुरड्याचा नाहक बळी गेला

Satara Leopard Attack News: बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

वीज गेली, बिबट्यानं अंधाराचा फायदा घेतला अन्...; दोन वर्षांच्या चिमुरड्याचा नाहक बळी गेला
| Updated on: Oct 03, 2026 | 11:16 PM

सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नहाळेवाडी, शिवथर, खोलवडी आणि मालगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नहाळेवाडी परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्या वारंवार दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास बौद्ध वस्तीत जय संदीप खंडागळे या दोन वर्षांच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार होता. याचाच फायदा घेत बिबट्याने चिमुरड्याला उचलून नेल्याचे सांगण्यात येत आहे. घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग सुरू केला.

Loading...

यानंतर सुमारे ५०० मीटरपर्यंत ग्रामस्थांनी पाठलाग केल्यानंतर बिबट्याने चिमुरड्याला सोडल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नहाळेवाडी, शिवथर, खोलवडी आणि मालगाव या भागात बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी यापूर्वीही वनविभागाकडे करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र वारंवार सूचना करूनही बिबट्याला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

चिमुरड्याच्या मृत्यूनंतर वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध आणि त्याला पकडण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याची माहिती अपेक्षित आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us