
देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, गेल्या आठवडाभरात देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 3000 च्या वर पोहचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3,395 वर पोहोचली आहे, यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल 1336 रुग्णांची नोंद एकट्या केरळमध्ये झाली आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये केरळ एक नंबरला, महाराष्ट्र दोन नंबरला तर दिल्लीचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. आज राज्यात 65 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पुण्यात 25, मुंबईमध्ये 22, ठाण्यात 9 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 506 वर पोहोचला आहे.
राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11501 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 814 जण कोरोनाबाधित आढळून आले, त्यातील आता 300 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर सध्या स्थितीमध्ये राज्यात एकूण 506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
ठाण्यातही धोका वाढला
दरम्यान ठाण्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज ठाण्यामध्ये 9 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता हा आकडा 108 वर पोहोचला आहे, यापैकी 59 कोरोना रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे. तर 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर सध्या स्थितीमध्ये 32 जण गृह विलगीकरणात आहेत.
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
दरम्यान देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य आणि आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.