Maharashtra DCM : तासा दोन तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा? राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, त्यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

Maharashtra DCM : तासा दोन तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा? राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी
Chhagan Bhujbal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 30, 2026 | 6:20 PM

राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे, अजित पवार यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्रिपद देखील रिक्त झालं आहे. त्यामुळे आता नवा उपमुख्यमंत्रि कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात देखील वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादीने पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे, या बैठकीमध्ये एकमुखानं नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यात आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्येच नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

राष्ट्रवादीचे नेते  प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील. मीही त्यात होतो. धनंजय मुंडे देखील होते. आमचं असं साधारण असं ठरलं, उद्या सीएलपीची मिटिंग घेऊन सुनेत्रा ताईंचं नाव सीएलपी लीडर म्हणून फायनल करायचं आहे. पत्र निघालं नाही, कारण दुखवटा आहे. सुतक आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. सुनील  तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्यात लक्ष घालत आहेत. येत्या तास दोन तासात आपल्याला त्याबद्दल कळेलच.

आज  विधान मंडळाचा प्रमुख म्हणजे सीएलपी लीडर नेमणे.  उपमुख्यमंत्री ठरवणे, हे महत्त्वाचं आहे.  बाकीच्या गोष्टी नंतरच्या आहेत. आज ते फार आवश्यक आहे. सरकार चालवायचं आहे. त्यात भाग घ्यायचा आहे. त्यामुळे पक्षाचा नेता ठरवला पाहिजे. त्याला आधी प्राधान्य देत आहोत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान काल रात्रीही  मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. उद्या शपथविधीसह इतर गोष्टी  करता येतील का असं विचारलं? तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला काही अडचण नाही, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादीकडून नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.