Diwali 2025 : कुठे जल्लोष, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह; पाहा यंदा काय खास?

यंदाच्या दिवाळी पहाट उत्सवाने महाराष्ट्रात मोठा उत्साह निर्माण केला. डोंबिवली, ठाण्यात पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने ढोल-ताशांच्या गजरात संस्कृती जपली. ठाण्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला.

Diwali 2025 : कुठे जल्लोष, तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रम, राज्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह; पाहा यंदा काय खास?
| Updated on: Oct 20, 2025 | 1:57 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेषतः फडके रोड आणि ऐतिहासिक गणेश मंदिर परिसरात तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच पारंपरिक वेशभूषेत आलेल्या हजारो तरुण-तरुणींनी गणरायाचे दर्शन घेत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. गर्व आहे मी डोंबिवलीकर असल्याचा, मराठी भाषा आणि संस्कृती जपा असे पोस्टर फडके रोड परिसरात झळकवून तरुणांनी आपली संस्कृतीनिष्ठा व्यक्त केली. यावेळी सांस्कृतिक नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य रांगोळ्या-सजावटीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमला होता. गणेश मंदिर संस्थान आणि विविध मंडळांकडून आकर्षक सजावट करण्यात आल्याने फडके रोड सेल्फी पॉइंट बनला होता.

ठाण्यात दिवाळीचा जल्लोष

ठाणे शहरात दिवाळी पहाटेनिमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जामीनाका परिसरात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या वतीने सांस्कृतिक संगीत, वाद्य वादन आणि ढोल-ताशा पथकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.

तर दुसरीकडे, ठाण्यातील तलावपाळी येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवासेना लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीने दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या जाहिरातीवर होणारा खर्च वाचवून त्या पैशातून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. ठाण्याची दिवाळी पहाट म्हणजे संस्कृती, जोश, जल्लोष आणि तारुण्याने नटलेला उत्सव असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

साताऱ्यात कारागृहातील कैद्यांसाठी दिवाळी पहाटचे आयोजन

साताऱ्यातील जिल्हा कारागृहात बंदिवानांसाठी ‘सप्तसूर फाउंडेशन’च्या माध्यमातून दीपावली पहाट हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गायकांनी हिंदी-मराठी चित्रपटांमधील गाणी सादर केली. विशेष म्हणजे, सातारा कारागृहाचे अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही आपली गाणी सादर करून बंदिवानांना आनंद दिला. या संगीत-कार्यक्रमाला बंदिवानांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने कारागृहातील वातावरण आनंदी आणि उत्साहाचे बनले.

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मंदिराची वेळ वाढवली

दिवाळीनिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराच्या वेळा वाढवण्यात आल्या. २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, रोप-वे ट्रॉलीची सुविधा देखील पहाटे ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, जेणेकरून आलेल्या प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता येईल.