शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची प्रतिक्षा लवकरच संपणार, भाजप आमदाराचे विधान
भाजप आमदार परिणय फुकेंनी महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची खात्री दिली आहे, परंतु आर्थिक स्थिरतेनंतरच. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी राज्यातील विकासकामांची माहिती दिली.

“राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर शेतकरी कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल. आम्ही जे आश्वासन दिले आहे, ते पूर्ण करणारच आहोत. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल,” असे स्पष्ट विधान भाजप आमदार परिणय फुके यांनी केले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला परिणय फुके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनेक विकासकामे
“राज्यात कोणतंही विकासकाम ठप्प झालेलं नाही. सर्व कामं वेगाने सुरू आहेत. विरोधक मात्र जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक गावात विकासकामे सुरु आहेत. भंडारा-गोंदियामध्ये गाळमुक्त धरण योजनेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जवळपास २०० तलावांतील गाळ काढण्याचं काम सुरू आहे. शिरपूर धरण आणि शिवनीबांध धरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. यावर्षी केवळ भंडारा-गोंदिया जिल्ह्यात २० ते २५ लाख क्युबिक मीटर गाळ काढला जाणार आहे. सरकारच्या सर्व योजना व्यवस्थित सुरू आहेत आणि त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे,” असे परिणय फुके यांनी म्हटले.
विकासासाठी योग्य प्रमाणात निधीची तरतूद
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणाबद्दल मागणी केली आहे. आता परिणय फुके यांनी भुजबळांच्या मागणीला समर्थन दिले. “ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव निधी असतो. त्याचप्रमाणे ओबीसींसाठीही असला पाहिजे. ओबीसींची लोकसंख्या विचारात घेऊन त्यांच्या विकासासाठी योग्य प्रमाणात निधीची तरतूद करावी,” असे मत परिणय फुकेंनी व्यक्त केले.
राज्याची आर्थिक स्थिती सुधारताच शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनावर परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्राची सध्याची आर्थिक स्थिती कर्जमाफी करण्याची नाही. त्याआधी राज्याची आर्थिक व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना निश्चितच कर्जमाफी दिली जाईल. बच्चू भाऊंना विनंती आहे की त्यांनी थोडा धीर धरावा. शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात ज्या भावना आहेत, त्याच भावना राज्य शासनाच्याही आहेत. मात्र, पैशाचं सोंग करता येत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सुधारताच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शासन करेल, असे परिणय फुके म्हणाले.
