कुठे ढगफुटीसदृश पाऊस, कुठे शेकडो एकर शेती पाण्याखाली; राज्यात मान्सूनचा हाहाकार, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

महाराष्ट्रात मान्सूनचा जोरदार हल्ला सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. जालना, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कुठे ढगफुटीसदृश पाऊस, कुठे शेकडो एकर शेती पाण्याखाली; राज्यात मान्सूनचा हाहाकार, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
maharashtra rain update
| Updated on: Jul 22, 2025 | 1:36 PM

राज्यात सध्या मान्सूनचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुंबई उपनगरांतही जोरदार पाऊस पडत असून याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल, सोमवारी शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये पावसाची अधिक नोंद झाली. पहाटेपासूनच घाटकोपर, अंधेरी, कुर्ला, परळ, आणि सांताक्रूझ या भागात पावसाचा जोर अधिक होता.

सांताक्रूझ येथील हवामान केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या २४ तासांत १९५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. तर सोमवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत कुलाबा केंद्रात ३२ मिमी पाऊस पडला. नैऋत्येकडून येणारे वाऱ्यांमुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील ४-५ दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जालन्यात ढगफुटीसदृश पाऊस; शेतीचे अतोनात नुकसान

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात काल सायंकाळच्या आणि मध्यरात्रीच्या सुमारास सर्वदूर पावसाने हजेरी लावत झोडपलं. पावसाचा जोर इतका होता की, तालुक्यातील तळणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. यामुळे पिकं पूर्णतः पाण्याखाली गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. जवळपास ३ ते ४ तास चाललेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. खरीप हंगामात लागवड केलेली कपाशी, सोयाबीन, मका यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

वाशिम जिल्ह्यात पूरस्थिती, अनेक मार्ग बंद, शेकडो एकर शेती पाण्याखाली

वाशिम जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यातील शेलू खडसे, वाकद आणि बालखेड परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाण्याचा मोठा प्रवाह शिरला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली गेल्याने बालखेड ते वाकद गावाचा संपर्क तुटला आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील रिसोड-मेहकर, करडा-गोभणी, सरपखेड-धोडप बुद्रुक हे प्रमुख मार्ग पूर्णतः बंद झाले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अकोला-बुलढाणा मार्ग बंद; लोणारमध्ये पाणी शिरले गावात

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणाऱ्या बाळापूर-शेगाव मार्गावरील जवळा गावाजवळ ओढ्याला आलेल्या पुरामुळे बाळापूर-शेगाव वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गेल्या एक तासापासून हा महामार्ग ठप्प आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील अनेक नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी काही गावांमध्ये शिरले असून, लोणार तालुक्यातील हिरडव गावात पाणी शिरल्याने गावचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तालुक्यात अद्यापही पाऊस सुरू असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. टिटवी, गुंधा, बोरखेडी येथील लघु तलाव शंभर टक्के भरले आहे. तसेच तलावातून सांडवा सुरू आहे. यामुळे परिसरातील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.