Video : 8 दिवस कुठे होतात ? सदाभाऊ खोतांवर गावकरी भडकले, घेराव घालत..

राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून मराठवाड्यासह सोलापूरमध्ये पूरस्थिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मात्र सोलापूरच्या माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सदाभाऊ खोत पाहणीसाठी येताच ग्रामस्थ चांगलेच संतापले. उशिरा आल्याबद्दल व जुन्या कारणांवरून त्यांनी सदाभाऊंना घेराव घालत प्रश्न विचारले. वाढता रोष पाहून सदाभाऊ खोतांना दौरा अर्धवट सोडून परतावे लागले.

Video : 8 दिवस कुठे होतात ? सदाभाऊ खोतांवर गावकरी भडकले, घेराव घालत..
सदाभाऊ खोत यांच्यावर गावकरी भडकले
| Updated on: Sep 27, 2025 | 11:29 AM

राज्यात सध्या अतिवृष्टीने धूमाकूळ घातला असून मराठवाड्यासह अनेक भागांत पावासाने दाणादाण उडवली आहे. सततचा पाऊस, पूर यामुळे अनेक गावांत पाणी शिरलं असून शेतात, घरात, पाण्यामुळे नासधूस झाली आहे. जमीनी, माती, पिकं वाहून गेली, घरातही ओल पसरली, यामुळे शेतकरी,सामान्य माणसाचे मोठे हाल होत असून लोकांच्या डोळ्यांत अश्रूंना खळ नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांनी विविध ठिकाणी दौरे करत पाहणी केली, नुकसानाचा आढावा घेत मदतकार्यही सुरू केले आहे.

सोलापूरमध्येही अशीच काही परिस्थिती आहे. मात्र याचदरम्यान आता सोलापूरच्या उंदरगावमधील ग्रामस्थ मात्र संतापले असून चांगलेच आक्रमक झालेले दिसले. त्यांचा रोष दिसला तो आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर, त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. गावात आलेल्या सदाभाऊ खोता यांना प्रश्न विचारात गावकऱ्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. 8 दिवस कुठे होतात, इतके दिवस का फिरकला नाहीत असे सवाल गावकऱ्यांनी त्यांना विचारले. मात्र ग्रामस्थांचा वाढता रोष पाहून सदाभाऊ खोत यांनी तिथून लवकरच पाय काढून घेतला.

खोत यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध

पावसामुळे म्हाडा तालुक्यातल्या सीना नदीच्या काठच्या लोकांचं, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. पाण्यामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं अशी परिस्थिती झाली असून त्यामुळे बळीराजा पूर्णपणे हतबल झालेला दिसला. मुख्यमंत्र्यांचा दौरा काही दिवसांपूर्वी झाला, त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांचा या भागात दौरा होता. मात्र ते म्हाडा तालुक्यातील उंदरगावमध्ये पोहोचताच काही वेळातच शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. त्यांच्या रोषामुळे सदाभाऊ खोत यांना दौरा तसाच सोडून गाडीत बसून तिथून निघावं लागलं.

आम्ही नेहमी पाठीशी उभे, त्यांनी आमच्यासाठी काय केलं ?

ज्या वेळेसे ते निवडणुकीसाठी उभे होते, तेव्हा आम्ही त्यांना 5 हजार रुपये मदत केली, गावानेही त्यांना लाख-दीड लाख रुपये दिले. 90 टक्के गाव, गावकरी त्यांच्या बाजूने उभे होते, पण त्यानंतर ते आलेच नाहीत, थेट आज आले. त्यांच्या पोराकरता त्यांनी दलबदलूपणा केला. शेतकरी संघटनेचा माणूस असल्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट केला. पण आता इतक्या दिवसांनी ते पाहणी करायला आलेत, याला काय अर्थ आहे ? असा सवाल एका ग्रामस्थाने विचारला. सतत या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून अजून कुठेतरी, पोरासाठी सगळा प्रपंच केला, आमच्यासाठी काय केलं त्यांनी ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तर आमचं म्हणणं होतं की त्यांनी येऊन टीव्हीवाल्यांना नुसता बाईट न देता, घराघरात जाऊन वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घ्याया पाहिजे अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.

एकंदरच गावकऱ्यांचा खोतांवर रोष असून त्यांच्या दौऱ्याला लोकांनी कडाडून विरोध केल्याचं दिसून आलं आहे.