Igatpuri News : फेरफार नोंदीत अनियमितता उघडकीस; एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित; प्रशासनात खळबळ

Igatpuri News : फेरफार नोंदीत अनियमितता उघडकीस आहे. त्यानंतर एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Igatpuri News : फेरफार नोंदीत अनियमितता उघडकीस; एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित; प्रशासनात खळबळ
talathi action
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Sep 11, 2026 | 9:27 AM

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गावनिहाय महसूल फेरफार नोंदी हाताळताना झालेल्या अनियमिततेची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने एका मंडळ अधिकाऱ्यासह पाच ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर (तलाठी) शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दफ्तर तपासणीत अनियमितता उघड

इगतपुरी तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या दफ्तरांची तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणीदरम्यान मुकणे, वाडीवऱ्हे, मुंढेगाव, सांजेगाव आणि गोंदे दुमाला येथील महसूल कामकाजात विविध अनियमितता आढळून आल्या. फेरफार नोंदी करताना संबंधितांना आवश्यक नोटिसा न बजावता कार्यवाही पूर्ण करणे, अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन फेरफार नोंदी घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी न करणे, तसेच खातेदार आणि हितसंबंधित व्यक्तींना नोटीस न देता फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, अशा गंभीर त्रुटी तपासणीत निदर्शनास आल्या.

मंडळ अधिकाऱ्यावरही ठपका

वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्या दफ्तर तपासणीत अधिनस्त तलाठ्यांच्या कामकाजावर आवश्यक नियंत्रण नसल्याचे आढळून आले. तसेच ई-ऑफिसद्वारे नामंजूर झालेल्या फेरफार नोंदींमध्ये संबंधित तलाठ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात कसूर झाल्याचेही तपासणीत समोर आले. या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

तीन तलाठी निलंबित

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी एका तलाठ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित दोन तलाठ्यांसह मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांची प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाई झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे

बबन कोकाटे — मंडळ अधिकारी, वाडीवऱ्हे
नितीन केदार — तलाठी, वाडीवऱ्हे
सोमनाथ सांगळे — तलाठी, गोंदे दुमाला
समीक्षा देव — तलाठी, सांजेगाव
मनोज वाकदकर— तलाठी, मुंढेगाव
पुष्कराज निकम— तलाठी, मुकणे

महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आता अधिक लक्ष

फेरफार नोंदींच्या कामकाजातील अनियमिततेवर थेट कारवाई झाल्याने इगतपुरी तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रशासनाकडून अधिक काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच तहसीलदार कार्यालयातील दफ्तराचीही अचानक तपासणी होणार असल्याने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सतर्कता वाढली आहे. महसूल नोंदींच्या कामकाजात नियमांचे पालन आणि पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने या कारवाईकडे पाहिले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us