
बदलापूर प्रकणातील दोन्ही पीडित चिमुलकल्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. “शिक्षण विभागाकडून मुलींच्या वडिलांना १० लाख रुपये मदत देण्यात आली आहे आणि त्या मुलीच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी ही आमच्या खात्याकडून घेण्यात येणार आहे. पदवी होईपर्यंत तिला मदत दिली जाणार आहे”, अशी महत्त्वाची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. तसेच “यात दोन केसेस आहे. एक असॉल्ट आणि एक रेप. रेपमध्ये १० लाख भरपाई देतात. असॉल्टमध्ये 3 लाखांची मदत देतात. त्या मुलींना शाळेत प्रवेश देण्याची मदत केली जाईल. ही मदत वैयक्तीक करण्यात येईल. १० लाखाच्या व्यतिरिक्त दोघींना मदत केली जाणार आहे. कुटुंबाची परवानगी असेल तर त्यांची गोपनीयता ठेवून शिक्षणाचा खर्च उचलला जाईल. त्यांना दरमहा खर्च दिला जाईल. या मुलीची घरच्या लोकांची माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार”, अशीदेखील माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
“शिक्षण विभागाच्या कार्यालयात आता अशा घटनाच्या संदर्भात तक्रार करण्याच्या संदर्भात एक वेगळा डेस्क तयार करण्यात येणार आणि या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार. आम्ही या संदर्भातील फक्त चौकशी केली आहे आणि यासंदर्भातील माहिती आम्ही गृह विभागला पाठवली आहे. त्यावर काही कारवाई ही गृहविभाग करेल आणि आत्ता एसआयटी स्थापन झाली आहे”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
“सीसीटीव्हीचे १५ दिवसाचे रेकॉर्डिंग गायब झालं आहे. ते का गायब झालं? याची पोलिसांनी चौकशी करावी. आदर्श विद्यालयमध्ये जी घृणास्पद घटना घडली त्याच्या संदर्भात कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्या कमिटीचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे”, अशी माहिती दीपकर केसरकर यांनी दिली.
“पॅनिक बटण देण्याच्या संदर्भात आम्ही काम करत आहोत आणि आत्ता मोबाईलमध्ये सुद्धा पॅनिक बटण असतो. त्यासंदर्भात आम्ही काम करणार आहोत. मुख्यध्यापकांना निलंबनाची नोटीस दिली आहे. सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यांना लिगल सल्ला घ्यायचा ते घेऊ शकतात”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. तसेच “पीआय म्हणाली माझी मानसिकता चांगली नाही मी उत्तर देऊ शकत नाही. आम्हाला उत्तर देऊ शकते. पण गृहविभागाला ती उत्तर देऊ शकत नाही. तिला लगेच निलंबित करतील. आम्ही पोलिसांना सांगतो त्यांनी याची दखल घेऊन चौकशी करावी”, असं दीपक केसरकर म्हणाले.