18 ते 44 वयोगटासाठीच्या लसी ज्येष्ठांसाठी वापरणार, राजेश टोपे हतबल

| Updated on: May 11, 2021 | 7:15 PM

लसीकरणाच्या सध्याच्या परिस्थितीवर हतबल झालेले राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 18 ते 44 वयोगटासाठी विकत घेतलेल्या लसी ज्येष्ठांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे (Rajesh Tope said Vaccines for the age group of 18 to 44 years will be used for seniors).

18 ते 44 वयोगटासाठीच्या लसी ज्येष्ठांसाठी वापरणार, राजेश टोपे हतबल
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसी पुरेशा योग्य नसल्याने राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्र सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, राज्यात अजूनही 45 वयापेक्षा जास्त वयोगटाच्या लाखो नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला नाही. याशिवाय लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्याचबरोबर पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर हतबल झालेले राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 18 ते 44 वयोगटासाठी विकत घेतलेल्या लसी ज्येष्ठांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे (Rajesh Tope said Vaccines for the age group of 18 to 44 years will be used for seniors).

राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

“राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा हा 6 लाखांच्या खाली आला आहे. 87 टक्के रिकव्हरी रेट झाला आहे. टेस्टिंग कुठेही कमी झालेले नाहीत. दररोज 2 लाख टेस्टिंग केले जात आहेत. राज्यात 1 कोटी 84 लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 35 हजार कोवॅक्सिन उपलब्ध आहेत. 5 लाख दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने आज 18 ते 44 वयोगटातील खरेदी केलेलं कोवॅक्सिन हे आता 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी वापरले जाईल”, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

“कोविडशिल्डचे 16 लाख डोस राहिले आहेत, जे केंद्र सरकारकडून देणे बाकी आहेत. काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. लसी उपलब्ध नाहीत. लस उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण स्लो डाऊन करावे लागेल का? अशी चर्चा झाली. उद्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होईल”, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं (Rajesh Tope said Vaccines for the age group of 18 to 44 years will be used for seniors).

हाफकीनला 1 लाख इंजेक्शनची ॲार्डर 

“काही जिल्ह्यात म्युकरमायकोसिस बाधित रूग्ण आढळत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारासाठी लागणारे 1 लाख इंजेक्शनची ॲार्डर हाफकीनला दिली आहे. म्युकरमायकोसिस जो बुरशीजन्य आजार आहे याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंर्तगत उपचार करता येतील का? याबाबत विचार सुरू आहे. लवकरच निर्णय होईल”, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा : महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचा धोका वाढला, एका दिवसात दोघांचा मृत्यू