विधान परिषदेच्या 5 जागांसाठी रणशिंग फुंकलं; कुठे थेट लढत, कुठे बंडखोरी? कोण आमनेसामने? पाहा संपूर्ण चित्र…
Maharashtra Legislative Council Election Candidate: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. कुठे महायुतीतच सामना, कुठे विरोधकांसमोर आव्हान? याचा संपूर्ण आढावा...

संदीप जाधव, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी- विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. त्यानंतर पाचही मतदारसंघांतील लढतीचं प्राथमिक चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि संभाजीनगर पदवीधर या पाच मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. या लढतीसाठी कोण कुठून उभे आहे, तसेच कुठे बंडखोरी झाली आहे? याचे चित्र आता समोर आले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत? पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे, तर काँग्रेसकडून जयंत आसगावकर मैदानात आहेत. त्यात शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामुळे या मतदारसंघातील समीकरणं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अन्य दावेदारांमुळे मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.
पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला बंडखोरीचं आव्हान पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांचे आव्हान आहे. मात्र राष्ट्रवादीचे भैय्या माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षासमोरच आव्हान उभं केलं आहे. याशिवाय माजी आमदार दत्ता सावंत यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीत बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे भाजपसमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीचे नितेश कराळे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर संजय थुल यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक रंगत अमरावती शिक्षक मतदारसंघात अनेक दिग्गज आणि बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे, ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने आणि शिवसेनेचे किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
याशिवाय युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे, तसेच भाजपशी संबंधित अनेक बंडखोर दावेदारांनीही अर्ज दाखल केले आहेत. शेखर भोयर हे भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे, तर सुमित पवार हे भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या बहिणी संगीता शिंदे यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अमरावतीत बहुकोनी लढत पाहायला मिळणार आहे.
संभाजीनगर पदवीधरमध्येही बंडखोरी संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांच्यात प्रमुख सामना आहे. मात्र भाजपचे नेते एम. के. देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपचीही या लढतीत एंट्री झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबत अतिरिक्त उमेदवारांमुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
पाचही मतदारसंघांतील अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीच्या टप्प्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला पुणे, नागपूर आणि अमरावतीमध्ये बंडखोरीचा मुद्दा ठळक तर सर्वच मतदारसंघांत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर अतिरिक्त उमेदवारांचं आव्हान असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडतं. अंतिम लढत कोणाकोणात होते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
