
राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या निकालाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कोणत्या पक्षाने कुठे विजय मिळवला हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. राज्यात महायुतीच्या 214 जागा, मविआ 49 आणि स्थानिक आघाडीच्या 25 जागा निवडून आल्या आहेत. दरम्यान, सांगली येथील पलूस नगरपरिषदेच्या निकालाने सर्वजण थक्क झाले आहेत. कारण पलूस येथे काँग्रेसचा दणदणती विजय झाला आहे.
संजीवनी पुदाले विजयी
सांगली येथील पलूस नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संजीवनी सुहास पुदाले,राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाकडून ज्योत्स्ना येसुगडे आणि भाजपाकडुन सोनाली नलवडे हे मैदानात होते. मात्र, संजीवनी पुदाले यांनी विजय मिळवला आहे. सांगली येथील पलूस नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता पाहायला मिळाली. पतंगराव कदम यांच्या विचारावर विश्वास ठेवून सत्ता दिल्या बद्दल आमदार विश्वजीत कदम यांनी जनतेचे आभार मानले आहेत. पलूसमध्ये सत्ता आल्यानंतर विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने पोलीसमध्ये दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले
पलूस नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले हे निवडून आल्यामुळे पलूस नगर परिषदेवर काँग्रेसचे सत्ता आली आहे. पलूस नगर परिषदे तिरंगी लढत होती. भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत होते तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची युती झाली होती. आणि काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार व उद्धव ठाकरे गट,अशी महाविकास आघाडी होती.
काय होता 2017चा निकाल?
2017मध्ये पलूस नगरपरिषद निवडणुकीत एकूण 17 प्रभाग होते. या 17 प्रभागांपैकी भाजपने 1 जागा जिंकली होती, राष्ट्रवादी काँग्रेसने 0 जागा जिकंली होती, काँग्रेसने 12 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 0 जागा जिंकल्या होत्या. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी 4 जागा जिंकल्या होत्या. आता 2025च्या निकालात काँग्रेसने थेट 15 जागांवर विजय मिळवला आहे.
सांगली विटा नगरपरिषदेवर फडकला शिवसेना शिंदे गटाचा भगवा
सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे. विटा नगरपरिषदेत सत्तांतर घडवत माजी आमदार व भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून काजल म्हेत्रे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.तर नगरसेवक पदाच्या निवडणूकीत 26 पैकी 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे.