
महाराष्ट्रात काल नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. भाजप प्रणीत महायुतीने संपूर्ण राज्यात घवघवीत यश संपादन केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विजयोत्सव सुरु आहे. त्याचवेळी विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. आगामी महापालिका निवडणुकीत निकालाचं चित्र काय असू शकतं, याचे संकेत सुद्धा या निवडणूक निकालातून मिळतायत. भाजपं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. 288 पैकी नगराध्यक्षाच्या तब्बल 207 जागा या तीन पक्षांनी मिळून जिंकल्या. विरोधी पक्ष महाविकास आघाडीला फक्त 44 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांना तळागाळापर्यंत पक्ष विस्ताराची अधिक संधी मिळणार आहे.
महायुतीमध्ये भाजपचे सर्वाधिक 117 नगराध्यक्ष आणि 3,300 नगरसेवक निवडून आले. एकूण नगरसेवकांची संख्या पाहता हे प्रमाण 48 टक्के होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा रेकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मन्स असल्याचं म्हटलं आहे. 2017 साली भाजपचे जितके नगरसेवक निवडून आले होते, त्यापेक्षा दुप्पट जागा यावेळी निवडून आल्या आहेत.
लोकाभिमुख विकासावर असलेला लोकांचा विश्वास
विकासाभिमुख कार्यामुळे इतका मोठा विजय मिळाल्याच भाजप आणि मित्र पक्षांचं म्हणणं आहे. लोकाभिमुख विकासावर असलेला लोकांचा विश्वास या निकालातून दिसून येतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आम्ही व्यक्तिगत टीका करणं टाळलं. सुशासन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि भविष्यात शहरांसाठी काय करणार ते सांगितलं, त्याचं हे यश आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पराभव मान्य केला. पण त्याचवेळी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. हा पैशांचा विजय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मते या निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष नव्हत्या. उद्धव ठाकरे शिवसेना गटाने धन शक्ती या विजयामागे असल्याचा आरोप केला तसच ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्षाने हे दावे फेटाळून लावले.
हा शरद पवारांसाठी धक्का
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी महायुतीने दमदार कामगिरी केली. विदर्भात महायुतीने 100 पैकी 73 जागांवर विजय मिळवला. फक्त चंद्रपूरमध्ये काँग्रेसने दमदार यश मिळवलं. पुण्यात आपलाच दबदबा असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दाखवून दिलं. बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवलं. हा शरद पवारांसाठी धक्का आहे. पुण्यातील जवळपास 10 नगराध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाचे निवडून आलेत.
मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या महत्वाच्या महापालिका निवडणुकीआधी नगर परिषदांमधला हा विजय महायुतीचा बळ वाढवणारा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून पाहिलं जातं.