
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहे. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, असा खणखणीत टोला विरोधकांकडून लगावला जात आहे. सध्या विरोधकांकडून कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला सुरु आहे. आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
“मी खालच्या सभागृहात नेमकं काय चाललं आहे, ते युट्यूबवर पाहण्यासाठी फोन सुरु केला होता. पण त्यावर कोणीतरी हा गेम डाऊनलोड केला होता, ती जाहिरात तो गेम स्कीप करत होतो, तेव्हा कोणीतरी तो व्हिडीओ काढला असेल. मी काय चोरी केलेली नाही किंवा शेतकऱ्याविरोधात भाष्य केले आहे किंवा अजून काही केलेले आहे, असे नाही. मी ते स्कीप करत होतो, तेव्हा हे घडलं. तुमच्याही मोबाईलवरही जाहिराती येतात. युट्यूब सुरु केलं तर त्यावर तुम्हालाही जंगली रमीची जाहिरात येते. गाण्याच्या जाहिराती येतात. कोणत्याही प्रकारच्या जाहिराती येतात. अशाप्रकारच्या जाहिराती येणं हे अपरिहार्य आहे, ते रोहित पवारांच्या मोबाईलवर येत नाहीत का, त्यांच्याही मोबाईलवर येतात. पण कोणत्या गोष्टीचे भांडवल करावं, कोणत्या गोष्टीचे भांडवल करु नये, हे रोहित पवारांना कळायला हवं. उगाचच ते स्वत:ची करमणूक करुन घेतात”, असे माणिकराव कोकाटेंनी म्हटले.
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अधिकृत एक्स हँडलवर त्यांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांचा एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे सभागृहात बसलेले असताना मोबाईलवर जंगली रम्मी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला रोहित पवारांनी कॅप्शनही दिले आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
“सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.