Live Update : पुणे महापालिकेची फूड टेस्टिंग मशीन झाली गायब
live update : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून रुग्णालयात दाखल केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गट आज सोनम वांगचुक यांच्यासाठी आंदोलन करणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
पुणे महापालिकेची फूड टेस्टिंग मशीन झाली गायब
राज्यात एका बाजूला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ विरोधी कारवाईचा धडका लावला आहे. मात्र असे असतानाच पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास 12 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आलाय.
-
रमेश म्हात्रे यांची आधारवाडी जेलमध्ये रवानगी
शास्त्रीनगर डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार विष्णुनगर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली, त्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी आता आधारवाडी जेलमध्ये करण्यात आली आहे.
-
-
रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले
रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रसूतीजन्य महिलेचे प्राण वाचले आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशन ब्रिज जवळ एक महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान प्रसूतीचे दिवस अपूर्ण असल्याने प्रसूतीनंतर हे मूल दगावले मात्र महिलेला उपचार वेळेत मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले आहेत.
-
सोलापुरात संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील 40 हजार भाविकांना महाप्रसादाची सोय
सोलापुरात संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील 40 हजार भाविकांना महाप्रसादाची सोय
5 हजार किली महाप्रसादासाठी 3 हजार किलो तांदळासह विविध पदार्थ बनवले जातात.
सोलापुरातील या तरुणांच्या मंडळात अडीचशे तरुण स्वयंसेवक म्हणून कार्यरत
गेल्या आठ वर्षांपासून उपक्रम सुरू
-
अंबड शहरात पाच ते सहा दुकानांना आग
c:जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आज सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास दुकानाना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असणारे फर्निचर दुकान, दूध डेअरीसह इतर 5 ते 6 दुकानांना आगीची झळ बसली आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
-
नेपाळमध्ये 5.0 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का
रविवारी नेपाळच्या लुंबिनी प्रांतातील पूर्व रुकुम जिल्ह्यात 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्यात आतापर्यंत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
-
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी फरार असलेले शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवली येथील पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी नगरसेवकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
-
फुटबॉलच्या अंतिम सामन्यानिमित्त केरळमधील सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर
खेळांना प्रोत्साहन देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून, फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने सोमवार, 20 जुलै 2026 रोजी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना (व्यावसायिक महाविद्यालयांसह) सुट्टी जाहीर केली आहे.
-
अयोध्या : निर्मोही आखाड्यातून महंत दिनेंद्र दास यांची हकालपट्टी
दिल्लीत 5 जुलै रोजी झालेल्या ‘पंच रामानंदिया’ निर्मोही आखाड्याच्या बैठकीत महंत दिनेंद्र दास यांना निर्मोही आखाड्यातून काढून टाकण्यात आले.
-
सोनम वांगचुक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान
सोनम वांगचुक यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वांगचुक यांच्या पत्नीने उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
-
पुणे : जुन्नरमध्ये बंद शाळेतून 3 किलो गांजा जप्त
पुणे ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेत जुन्नर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. जुन्नरमधील बंद असलेल्या अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक 4 च्या परिसरात छापा टाकत पोलिसांनी तब्बल 3 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत इनोव्हा कार, ॲक्टिव्हा स्कूटर आणि इतर मुद्देमालासह साडेदहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
-
भंडारा जिल्ह्यात विश्रांतीनंतर पावसाची दमदार बॅटिंग
भंडारा जिल्ह्यात 2 दिवस पाऊस पडल्यानंतर आज दिवसभर पावसानं विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली असून, संततधार सुरू असलेल्या पावसामुळं शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील भात पिकाला या आता नवसंजीवनी मिळाली असून, रखडलेली शेतीकाम आता पूर्ण वेगानं सुरू झाली आहेत.
-
भंडाऱ्यात आमदारांच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीचं ‘ढोल बजाव’ आंदोलन
भारतात जनगणना सुरू आहे. मात्र, त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं जनगणनेसाठी ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा, या मागणीला घेऊन भंडाऱ्यात मागील 70 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज या आंदोलकांनी भंडाऱ्यात ढोल बजाव आंदोलन केलं. भंडाऱ्याचे शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, साकोली काँग्रेस आमदार नाना पटोले, तुमसरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आलं.
-
आपल्याला सरकार बदलायचं आहे – उद्धव ठाकरे
शिवाजी पार्कमधील आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘हा लढा आता हे सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचं आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. एकच वचन द्या. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झालं पाहिजे.’
-
शिवाजी पार्कवरील आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची
शिवाजी पार्कवरील शिवसेना ठाकरे यांच्या आंदोलनात पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी पोडियम स्टेज लावण्यास विरोध करताच कार्यकर्ते भडकले आणि भाजपाच्या दबावा मुळे पोलीस विरोध करीत असल्याचे कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके सुकू लागली होती. अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, मका आणि इतर पिकांनी माना टाकल्या होत्या. अशा परिस्थितीत आज झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
-
भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे अंगणवाडीतील पोषण आहार विक्री केल्याने गोंधळ
भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे अंगणवाडीतील पोषण आहार विक्री केल्याने गोंधळ, सेविका ग्रामस्थांच्या ताब्यात. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील अंगणवाडी क्रमांक 507 मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
-
बीडमध्ये सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी
बीड तालुक्यातील मांजरसुंबा, ससेवाडी, मोरगाव आणि खंडाळा या परिसरातील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या होत्या. यानंतर कृषी विभाग आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी केली. यादरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दबाव टाकून तक्रारी मागे घ्यायला लावल्याचा गंभीर आरोप खंडाळा गावातील एका शेतकऱ्याने केला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी मागे घेतल्या असून दबाव टाकूनच या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडल्याची माहिती शेतकरी देत आहेत मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत. दरम्यान आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर शेतात जाऊन पाहणी केली आणि संबंधित कंपनी व दुकानदारांना सांगून त्यांना तात्काळ बियाणे उपलब्ध करून दिले. अनेक शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेल्या आहेत मात्र त्यांच्यावर दबाव टाकला गेला नाही अशी माहिती बीड तालुका कृषी अधिकारी अनिरूद्ध सानप यांनी दिली आहे.
-
मराठाकालीन ऐतिहासिक तोफ किल्ल्यावरुन चोरी झाल्याची माहिती
मराठाकालीन ऐतिहासिक तोफ किल्ल्यावरुन चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे, तब्बल 300 किलो वजनाची अतिशय दुर्मळ होती. आंतरराष्ट्रील बाजारात या तोफेची किमत तीन ते पाच कोटींच्या घरात आहे.
-
अमरावतीमधील बनावट बियाणे प्रकरणी 38 कंपन्यांविरोधात FIR दाखल
अमरावतीमधील बनावट बियाणे प्रकरणी 38 कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या निदेर्शनानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
-
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंचं मुंबईत आंदोलन
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरेंचं मुंबईत आंदोलन होणार आहे. आज दुपारी 4 वाजता हे आंदोलन होणार आहे. आता या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. अनेक शिवसैनिकांनी पार्काच्या परिसरात आपली हजेरी लावली आहे.
-
सातऱ्यामधील धबधबे प्रवाहित
सातऱ्यामध्ये झालेल्या पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहे. एकीव धबधवा ओसांडूव वाहताना दिसत आहे. भांबवली, वजराई धबधबा पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी झाली आहे.
-
जगभरातील फेसबुक वेबसाईट डाऊन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये फेसबुक सुरु होत नाहीये.
-
आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेजवळ दोन बिबट्यांचा मुक्त संचार
इगतपुरी तालुक्यातील शेणवड इथल्या आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेजवळ दोन बिबट्यांचा मुक्त संचार होता. मध्यरात्री कामावरून घरी जात असताना वाहनचालकाने या बिबट्यांना पाहिलं. वाहनचालकाने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. बिबट्याच्या मुक्त संचाराने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
-
भर पावसात एकनाथ शिंदेंकडून पंढरपुरातील पूर्वतयारीचा आढावा
पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भर पावसात दर्शनबारीतील वारकऱ्यांची भेट घेत आहेत. धो-धो पाऊस पडताना एकनाथ शिंदे हे वारकऱ्यांची संवाद साधत आहेत आणि दर्शन बारीतील भाविकांना पाण्याच्या बाटल्या वाटत आहेत. यावेळी त्यांनी तिथल्या शौचालयांचीही पाहणी केली आहे. येत्या आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा आणि पाहणी करणाऱ्यासाठी उपमुख्यमंत्री पंढरपूर दौऱ्यावर आहेत.
-
लोड शेडिंग, वन्य प्राण्यांच्या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीच्या महिला आमदारांची तक्रार
नाशिक- लोड शेडिंग आणि वन्य प्राण्यांच्या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीच्या महिला आमदारांनी तक्रार केली. देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आमदार सरोज अहिरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून संभाषण झालं. या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर मुख्यमंत्र्यांकडूनदेखील आमदार अहिरे यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली.
-
खेड तालुक्यातील पाईट – शिरोली रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडी बसचा अपघात
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट – शिरोली रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडी बसचा अपघात झाला. पाईट – शिरोली रस्त्यावर गोगावले वस्तीजवळील धामणे फाटा इथं भीषण अपघात झाला. मालवाहू टेम्पोची आणि लग्नाच्या वऱ्हाडी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने चांडोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं आहे.
-
उद्धव ठाकरे यांचं राम प्रेम हे बेगडी राम प्रेम- भाजप खासदार
“उद्धव ठाकरे यांचं राम प्रेम हे बेगडी राम प्रेम आहे. उद्धव ठाकरे यांनी केव्हाच या हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे. मशीदवर हिरवी चादर टाकणं आणि स्वतःला जनाब म्हणून घेणं हे उद्धव ठाकरे यांचं सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे हे विसरले आहेत. काल रामरक्षा पठण केलं, त्यात नुसती आरती केली. त्यामध्ये दिवासुद्धा लावला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली,” अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली.
-
पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखे आकर्षण
पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखे आकर्षण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिला आहे. खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड व कान हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करतो. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्येही या रोबोटिक हत्तीबाबत मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. भक्ती, तंत्रज्ञान आणि प्राणी संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..
सातारा जिल्ह्यातील बरड येथील मुक्काम संपवून, सातार करांचा पाहूणचार घेतल्यानंतर..’ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर म्हणजेच धर्मपुरी येथे दाखल झालीय. विठुरायाच्या भेटीची आस मनात घेऊन आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज, सातारा जिल्ह्याचा पाहुणचार संपवून सोलापूर जिल्ह्यात प्रविष्ट झाला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले, यावेळी टाळ मृदूंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात धर्मपुरीचा परिसर न्हाऊन निघाला.
-
उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनासाठी मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ पोलीस बंदोबस्त वाढला
उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनासाठी मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ पोलीस बंदोबस्त वाढला आहे. एमर्जन्सी रिस्पॉन्स मोबाईल सर्व्हे अलायन्स कंट्रोल अँड कमांड सेंटर व्हॅन, दोन पोलीस व्हॅन, आणि १०० च्या वर महिला पोलिस बंदोबस्त दाखल झाला आहे.
-
स्मार्ट टॉयलेट बनले ड्रग्ज तस्करांचा अड्डा मकोकाच्या आरोपीसह तिघे जेरबंद
नागपूर महापालिकेच्या स्मार्ट टॉयलेटचा ड्रग्ज साठ्यासाठी वापर उघड. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नंदनवन झोपडपट्टी परिसरातील केडीके कॉलेज मार्गावरील स्मार्ट टॉयलेटमध्ये छापा टाकून कारवाई करण्यात आली. मकोकाचा आरोपी निलेश डोरसेसह सूरज उईके व अब्दुल शफिक अटक झाली आहे. दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून स्मार्ट टॉयलेटच्या वरच्या खोलीतून तब्बल 24 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरात ड्रग्ज तस्करीविरोधात पोलिसांची मोठी आणि धडक कारवाई मानली जात आहे.
-
यांच्यापेक्षा कुत्र फार इमानदार असतं- निलेशचंद्र मुनी
कुत्र म्हणजे श्वान यांच्यापेक्षा कुत्र फार इमानदार असतं. ज्याची भाकर खातं त्याची चाकरी करतं. मला सकाळपासून धमक्या, मारण्याचे फोन येत आहेत मी घाबरण्यातला महाराज नाही. ते असं पण म्हणत्यात की जैन समाजाने याला नाकारलेला आहे ज्या दिवशी जैन समाज मला नाकारेल त्या दिवशी मी बाबा बनेल असे निलेशचंद्र मुनी यांनी म्हटले आहे.
-
नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात
नगर मनमाड महामार्गावरल भीषण अपघात झाला आहे. कोल्हार परिसरात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर महिलेला जवळपास दीडशे फूट ओढत नेले. अपघातात दुचाकीवरील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
-
मुसळधार पावसामुळे भांडुप मधील फुटपाथ खचला
मुसळधार पावसामुळे भांडुप मधील फुटपाथ खचल्याचे समोर आले आहे. भांडुप पश्चिम भागातील व्हिलेज रोड जवळ ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास घटना घडली आहे. खचलेल्या फुटपाथमध्ये दोन दुचाकी देखील खाली पडल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी महापालिका अधिकारी दाखल झाले आहेत.
-
कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारचा भीषण अपघात
आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कोस्टल रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या पोर्शे कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात बचावला.
-
वांगचूक यांना पाठिंबा देत मसलगा येथे लाक्षणिक उपोषण
लातूर जिल्ह्यातल्या मसलगा येथील गावकऱ्यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला निलंगा तालुक्यातल्या या मसलगा येथील गावकऱ्यांनी पाठिंबा देत एक दिवसाचे उपोषण आंदोलन सुरूवात केले आहे. गावातल्या चावडीवर हे गावकरी एकत्र येत लाक्षणिक आंदोलन करीत आहेत. सोनम वांगचूक यांनी आंदोलना दरम्यान केलेल्या मागण्यांचे गावकऱ्यांनी समर्थन केलेले आहे.
-
परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
21 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्याने 8जागांसाठी 14 मतदान केंद्रावरमतदान प्रक्रिया पार पडणार. मध्यवर्तीबँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी एकत्र आल्याचं चित्र. मतदान केंद्राच्या बाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर उंडाळ यांनी.
-
नंदुरबारच्या आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेवर आमदार आमश्या पाडवी आक्रमक
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नातून दुर्गंधी; मंत्री मात्र उत्कृष्ट जेवणाचा दावा करत असल्याचा आरोप. सत्ताधारी आमदारांचाच आदिवासी विकास मंत्र्यांवर निशाणा; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करत असून विभागातील वास्तव लपवले जात असल्याचा आरोप. आदिवासी विकास विभागाचे अधिकारी कुठे कार्यरत आहेत, हेही मंत्र्यांना माहिती नसल्याचा दावा..
-
केंद्रीय मंत्रिमंडळात पार्थ पवारांना मंत्रीपद द्यावे; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांची मागणी
पार्थ पवारांना मंत्रीपद देणे म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासारखे; मोरे यांचे वक्तव्य. एनडीएमध्ये राष्ट्रवादी कमी संख्या असतानाही मिठासारखी चव देण्याच्या प्रभावी भूमिका बजावत आहे. अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता पार्थ पवार यांच्यात असल्याचा विश्वास. पार्थ पवार मंत्री झाल्यास कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असा दावा….
– -
कल्याण-डोंबिवलीत पावसाचे पुनरागमन! आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण; अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरात हजेरी लावली. काही भागांत रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस; वातावरणात गारवा. आठवडाभरापूर्वीच्या मुसळधार पावसात कल्याण-डोंबिवलीतील अनेक सखल भाग जलमय झाले होते. आजही पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
-
एकनाथ शिंदे विनोबा भावे नाहीत- संजय राऊत
आमच्या मशालीवर निवडून आलेले लोक 50 – 50 कोटी देऊन घेऊन गेले. 6 खासदारांना लाज वाटली पाहिजे. एकनाख शिंदे काह विनोबा भावे नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
-
भीती वाटली म्हणून तुम्ही वांगचुक यांना घेऊन गेला- संजय राऊत
वांगचुक यांच्या उपोषणाच्या मुद्द्यात संजय राऊत यांनी जोरदार टीका सरकारवर केली. त्यांनी म्हटले की, भीती वाटली म्हणून वांगचुक यांना घेऊन जाण्यात आले. देशात हुकूमशाही सुरू आहे.
-
विनापरवानगी खोदकाम केल्यास कडक कारवाई करणार, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांचा इशारा
शहरात रस्ते खोदल्यामुळे पाईपलाईन, विद्युत आणि टेलिफोन केबल्स यासारख्या आवश्यक सेवा विस्कळीत होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता शहरात कोणत्याही स्वरूपाचे खोदकाम करण्यापूर्वी मनपाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या जमिनीखालील केबल आणि पाईपलाईनचे जीपीएस मॅपिंग मनपाकडे सादर करणे अनिवार्य असेल
-
कल्याण-डोंबिवलीतील 100 टक्के नालेसफाईचा दावा फेल?
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १०० टक्के नालेसफाईच्या दाव्याची गोविंदवाडी येथे पोलखोल झाली आहे. कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी मुख्य नाला सध्या प्लास्टिक कचरा आणि जलपर्णीने पूर्णपणे झाकला गेलाय. नाल्यातील कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला असून तुंबण्याचा धोका निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
-
नंदूरबारमध्ये पावसाने फिरवली पाठ, शेतकरी चिंतेत
नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीपिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
दीड महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
भूजल पातळी घसरली, विहिरी-नाले आटले आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट उभं ठाकलं आहे. -
परभणीत जोरदार पाऊस, पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती
परभणी जिल्ह्यातील काही भागात रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती झाली. रेल्वे स्थानकात छतावरून धबधब्यासारखे पाणी पडत असल्याने प्रवाशांना पावसाचा फटका बसला. प्लॅटफॉर्म मध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
-
नाशिकमध्ये माजी महापौराला व्यावसायिकाने घातला गंडा; तब्बल 200 तोळे सोन्याची फणवणूक
नाशिकच्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांची 200 तोळे सोन्याची फणवणूक करण्यात आली आहे. सराफ विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत सराफ व्यावसायिकाने गंडा घातल्याचे समोर आलं आहे. कुटुंबाशी जवळीक साधत घरातील महिलांकडून 200 तोळे सोने घेतले.
-
पुण्यात उद्या 10 हजार डॉक्टरांचा संप; सकाळी ६ पासून हॉस्पिटल बंद ठेवणार
पुणे जिल्ह्यातील दहा हजार डॉक्टरांनी उद्या संपाची घोषणा केली आहे. त्यानंतर पुण्यातील डॉक्टर सकाळी ६ पासून हॉस्पिटल बंद ठेवणार आहेत. २० जुलैला सकाळी सहा ते 21 जुलैला सकाळी सहापर्यंत खासगी हॉस्पिटल बंद असणार आहे. परंतु वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार नाही. त्यांच्याकडून आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणाच्या 21 व्या दिवशी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आता जंतर-मंतरवर अभिजीत दीपके यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. परंतु मध्यरात्री अभिजीत दीपके यांना अटकेची चर्च आंदोलकांमध्ये पसरली. त्यानंतर उपोषणस्थळी मोठ्या संख्येने तरुण जमा आले. जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनात आज ठाकरे गट देखील मुंबईत आंदोलन करणार आहे. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावासामुळे काही भागात पूरस्थितीचे चित्र निर्माण झालं आहे.