Maharashtra News LIVE : मुंबईत पावसाचं कमबॅक, काही भागात रात्रीपासून पाऊस
Maharashtra News LIVE : मुंबईत पावसाचं जोरदार कमबॅक झालं आहे. मुंबईतील काही भागात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वसई-विरार भागातही पाऊस सुरू आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भांडूप पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींचा गुटखा जप्त
भांडुप पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गणेशोत्सव काळात होणारी गुटख्याची विक्री रोखण्यासाठी कोट्यावधींचा गुटखा जप्त केला. गुटख्याने भरलेला कंटेनर भांडुप पोलिसांनी पकडला. अन्न व औषध प्रशासन आणि भांडुप पोलिसांकडून मुद्देमालसह आरोपींना अटक केली.
-
सोलापूरच्या विंचूर गावात गॅस सिलेंडरचा स्फोट
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे . सुदैवानं स्फ़ोटात कोणतीही जीवितहानी नाही मात्र घरांचे नुकसान झालं. गॅसच्या स्फोटामुळे तीन घरांना आग लागली. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गॅसचा स्फोट होताना आवाज मोठा आल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरलं.
-
-
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदानात पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे. आता त्यांनी अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून परवानगी मिळते का, हे पाहावे लागेल. परंतु त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर येऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
-
नाशिकमध्ये आंघोळ करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
नाशकात स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना शॉक लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेजस संजय जगताप असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिसॉर्टमधील स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. तरुणाच्या शरीराचा उच्चदाबाच्या विज तारेला स्पर्श झाल्याने जोरदार शॉक बसला. शॉक लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे विचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले .
-
जळगावात भीषण अपघात, कारच्या धडकेत गणेश मंडळाने उभारलेला मंडप कोसळला
जळगावच्या रिंग रोड परिसरात भरधाव चार चाकीने दिलेल्या धडकेत गणेश मंडळाने उभारलेला मंडप कोसळला. अजय कॉलनी गणेश मित्र मंडळाच्या उभारलेल्या मंडपाला अज्ञात चारचाकी ने धडक दिल्याने मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. मंडपाला धडक दिल्यावर तसेच मंडप कोसळून पडल्यावर झाल्यावर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झालाय.
-
-
जळगाव जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान
जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १६.५ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतांमध्ये माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या 24 तासांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात देखील घट झाली.
-
पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे निधन
जुन्नर तालुक्यातील महिला नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आणि भाजपा नेत्या आशा बुचके यांचे निधन झालं. त्यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
-
लक्ष्मण हाकेंशी झटपट करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
-सोलापूरच्या पाकणी फाटा येथे OBC नेते लक्ष्मण हाकेंशी झटपट करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि संबंधित तरुणाच्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हाकेंसोबत शाब्दिक वाद घालणारे दोघेही लातूर जिल्ह्यातील चाकूरचे रहिवासी असून ऍड. प्रकाश सोमवंशी आणि चंद्रकांत एकनफळे अशी त्यांची नावे आहेत.
राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई शहरातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर कांदिवली-मालाड पश्चिम परिसरात काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवात विरारहून गावाकडे जाणाऱ्या कोकणकरांचे सलग पडणाऱ्या पावसाने हाल सुरू झालेत. विरारकडून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक वाहनांना कसरत करावी लागत आहे. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे. तसेच अनेक वाहनांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून पडायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. यासहित शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यासहित विविध भागातील सर्व अपडेट जाणून घ्या