कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत रणसंग्राम, महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर आरोप काय?
Mahendra Thorve on Sunil Tatkare: रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पुन्हा पेटला आहे. राष्ट्रवादी महायुतीत आल्यापासून या जिल्ह्यात दोन्ही पक्षातील वाद टोकाला गेल्याचे वारंवार समोर आले आहे. आता शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पुन्हा एकदा उफाळला. राष्ट्रवादी महायुतीचा भाग झाल्यापासून या जिल्ह्यात दोन्ही पक्षात समेट तशी घडलीच नाही. मुद्दा मिळाला की दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी सोडत नाहीत. पालकमंत्री पदाचा वाद शमल्यानंतर आता तरी गुण्यागोविंदाने हे पक्ष नांदतील असे वाटत असतानाच महाएल्गार आंदोलनावरून सेना राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम सुरू झाला आहे. माझ्या मतदार संघात सुनील तटकरे यांनी कंपन्याना ब्लॅकमेल करू नये असा गंभीर आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.
काय आहे हा वाद?
खालापुरातील टाटा स्टील व गोदरेज कंपनी विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सर्व पक्षीय महायल्गार आंदोलन पुकारले होते. त्यांच्या अनेक मागण्या होत्या. पण खासदार सुनील तटकरे यांनी मध्यस्थी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत कंपनीबरोबर चर्चा करून मार्ग काढला जाईल असा शब्द घेतला होता. त्यानुसार अलिबाग येथे काल दोन्ही कंपन्याचे व्यवस्थापन जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व सहकारी आणि शिवसेना उबाठा, काँग्रेस आय, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष काही संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकी नंतर टाटा स्टीलने काही अंशी मागण्या मान्य केल्या पण गोदरेज कंपनी ने कोणतीच सहकार्याची भूमिका घेतली नसल्याचे सांगत तटकरेनी नाराजी व्यक्त केली. गोदरेज कंपनी विरोधात असणाऱ्या अनेक जमिनी संदर्भातील तक्रारींच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.
तटकरे यांच्यावर थोरवे यांचा गंभीर आरोप
या सर्व प्रकरणावर बोलताना कर्जत खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांना चांगलेच सुनावले व खासदार सुनील तटकरे यांनी माझ्या मतदार संघात कंपन्याना ब्लॅकमेल करू नये असा इशारा दिला. खालापूरमधील कंपन्यांना राष्ट्रवादी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या नवीन वादामुळे दोन्ही पक्षात काहीच आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
