Maharashtra News LIVE : भाईंदर इथल्या तपोवन शाळेत डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल 50 रुपयांचा ठोठावला दंड
Maharashtra News LIVE : भाईंदर इथल्या 'तपोवन विद्यालय' या शाळेनं एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल 50 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याविरोधात मीरा-भायंदर महापालिकेच्या (MBMC) शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
ठाण्यात मध्यरात्री बोनटवर बसून जीवघेणा स्टंट
ठाण्यातील वर्तकनगर परिसरात काल मध्यरात्री चालत्या कारच्या बोनटवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी जीव धोक्यात घालून सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, आता ठाणे पोलीस या बेधडक स्टंटबाजांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
गणेश मूर्ती विसर्जन केल्याने कृष्णानदीचे पाणी हिरवंगार
सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणावर महापालिका आयुक्तांनी एक नवा जावई शोध लावला आहे. कृष्णा नदीचं हिरवंगार झालेलं पाणी, नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जन केल्याने झाल्याचा दावा महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी केला आहे.
-
-
अमरावतीत घनकचरा वाहतुकीची 100 वाहने बेपत्ता
अमरावतीत घनकचरा वाहतुकीची 100 वाहने बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. कोणार्क कंपनीची राजापेठ पोलिसांत धाव. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनावर परिणामाची शक्यता वर्तवली जात आहे.
-
सिन्नरच्या वीर सावरकरनगरमध्ये बिबट्याचा थरार
सिन्नरच्या वीर सावरकरनगरमध्ये बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. बिबट्या थेट बंगल्यात शिरून कुत्र्याच्या पिल्लाची शिकार करताना दिसला. संरक्षक भिंतीवरून उडी मारून पोर्चमध्ये असलेल्या कुत्र्याच्या पिल्लावर झडप घालत अवघ्या काही सेकंदांत बिबट्याने पिल्लाची शिकार केली
-
शाळेत डब्यात मेथीची भाजी आणल्याने एका विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड
पर्युषण काळाच्या नावाखाली आता शालेय विद्यार्थ्यावर अजब बंधने घालण्याचा प्रकार आता सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेत विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट, कंदमूळ आणण्यास बंदी घातली होती. शाळेच्या कँटिनमध्येही यावर बंदी घातली होती. पर्यषण काळातील अजब फतव्यावरून राज्यभरातून एकच टीका झाली. त्यानंतरही मीरा-भाईंदरमध्ये अजब फतवे सुरूच आहे. आता तर शाळेत डब्यात मेथीची भाजी आणल्याने एका विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना घडली आहे.
-
-
नांदेड- माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जातीवाचक भाष्य आणि विशिष्ट समाजाच्या महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी नांदेड शहरातील वजीराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात सकल मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाषण करताना जातीवाचक भाष्य केलं. तसंच एका जातीच्या महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. याबाबत माजी नगरसेविका अंजली गायकवाड यांनी तक्रार दिली. त्यावरून रात्री वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
-
बहुचर्चित नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
नाशिक- बहुचर्चित नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. नाशिक-जळगाव जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील केंद्राची मंजुरी मिळालेला पहिला प्रकल्प आहे. नाशिकच्या पश्चिम भागातून समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी गिरणा नदी खोऱ्यात वळवणार आहेत. नार-पार नद्यांमधून १०.७६ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
-
150 मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली
150 मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली असून याबद्दल रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. 11 वाजता गणेश मंडळांना घेऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
-
महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघातर्फे दुष्काळग्रस्तांसाठी साडेचार कोटी रुपयांची मदत
महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघातर्फे दुष्काळग्रस्तांसाठी साडेचार कोटी रुपयांची मदत देण्यात आली. महाराष्ट्राच्या कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन दुष्काळ निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला. एकूण 14 हजार 445 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी अधिकारी कायमच शेतकऱ्यांच्या सेवेशी बांधिल असून आम्ही आजही त्यांच्या बांधावर आहोत. त्यामुळे कृषीसेवा महासंघाने शेतकऱ्यांना मदतीसाठी हा उपक्रम राबवला आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना पत्राद्वारे या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
-
मिरा भाईंदर इथल्या ‘तपोवन विद्यालय’ या शाळेनं एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल 50 रुपयांचा दंड
मिरा भाईंदर इथल्या ‘तपोवन विद्यालय’ या शाळेनं एका विद्यार्थ्याला डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल 50 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याविरोधात मीरा-भायंदर महापालिकेच्या (MBMC) शिक्षण विभागाने शाळेला नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी रॉबर्ट डीसोझा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. शाळेत बहुतांश विद्यार्थी जैन समाजाचे असल्याने प्रवेशावेळीच मांसाहार आणि कंदमुळे न आणण्याच्या सूचना दिल्या जातात, असा आरोप त्यांनी केला. जबरदस्तीने खानपानाच्या सवयी लादणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिक्षण अधिकारी सुलभ वतारे यांनी नोटीस पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Maharashtra News LIVE : गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर मुंबईकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत. बसेससाठीही मोठया प्रमाणावर गर्दी बघायला मिळतेय. कोकण रेल्वेवरील मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनला देखील मोठी गर्दी असल्याच पाहायला मिळतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एसटी प्रशासनाकडून मुंबई, ठाणे, विठ्ठलवाडी, वसई-विरारसाठी जादा बसेस सोडल्याअसून याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. जिल्हातून चारपेक्षा जास्त एसटी बसेस मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीला अखेर ब्रेक मिळाला आहे. वाहतुकीचा ताण कमी झाला असून मुंबई-गोवा महामार्गावर चित्र बदललं आहे. वाहनांच्या रांगा घटल्या असून महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..