Maharashtra News LIVE Updates : टिपू सुलतानवरून राज्यात भाजप-काँग्रेस एकमेकांसमोर

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व शिवमंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी उसळली असून, आकर्षक सजावट आणि शासकीय महापूजांनी संपूर्ण राज्य शिवभक्तीत तल्लीन झाले आहे.

Maharashtra News LIVE Updates : टिपू सुलतानवरून राज्यात भाजप-काँग्रेस एकमेकांसमोर
breaking news
| Edited By: | Updated on: Feb 15, 2026 | 12:29 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Feb 2026 12:00 PM (IST)

    भाजप युवा मोर्चाचं नागपुरात आंदोलन

    भाजप युवा मोर्चाचं नागपुरात आंदोलन करण्यात आलं. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलं. टिपू सुलतान ची तुलना करताना शिवाजी महाराज सारखा योद्धा म्हणून उल्लेख केला होता. त्याविरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू आहे.

  • 15 Feb 2026 11:45 AM (IST)

    अमरावतीच्या कांतानगरमधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी….

    अमरावतीच्या कांतानगर मधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाली आहे.  पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाली आहे. नलदमयंती आणि शहानुर अपारमेंट मध्ये चोरीची घटना घडली असून  लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. रात्री पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.  पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू  करण्यात आला आहे.

  • 15 Feb 2026 11:35 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा

    त्रपती शिवाजी महाराज युवक संघठना तर्फे आज लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा तसेच महाराष्ट्र भवन, लंडनसाठी जाहीर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी विविध आठवणींना उजाळा दिला.

  • 15 Feb 2026 11:25 AM (IST)

    विरारच्या श्री शेषनागलिंग मंदिरात महाशिवरात्रि निमित्ताने भाविकांची तुफान गर्दी

    मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या श्री शेषनागलिंग मंदिरात महाशिवरात्रि निमित्ताने भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भाविकांच्या 5 ते 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

  • 15 Feb 2026 11:09 AM (IST)

    नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन केले जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख केल्याने भाजप आक्रमक झाले आहे. आमदार देवयानी फरांदे काँग्रेसच्या कार्यालयावर भाजप पदाधिकाऱ्यांसह चालत जात आहेत.

  • 15 Feb 2026 10:55 AM (IST)

    न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी

    अमरावतीच्या कांतानगर मधील न्यायाधीशांच्या निवासस्थानी मध्यरात्री चोरी झाली आहे. पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी रात्री चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण उपस्थित केले जात आहेत.

  • 15 Feb 2026 10:43 AM (IST)

    मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता निलंबित

    मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी एमएमआरडीएने कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच बरोबर मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. शनिवारी दुपारी मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रोच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

  • 15 Feb 2026 10:30 AM (IST)

    धाराशिवमध्ये पोलिसांसमोरच दोन गटात हाणामारी

    धाराशिवच्या कळंब शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात पोलिसा समोरच दोन गटात हाणामारी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीवरुन हानामारी झाल्याची माहिती असून कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भर चौकात पोलिसांन समोरच राडा, पोलिस हाणामारी होत असताना होते भांडण मिटवण्याच्या भुमीकेत.

  • 15 Feb 2026 10:15 AM (IST)

    भारत-पाकिस्तान सामना भाजपचा खेळ; संजय राऊतांची टीका

    भारत-पाकिस्तान सामना भाजपचा खेळ. या सामन्यातून सगळ्यांना शेकडो कोटी रुपये मिळतात. मागच्या सामन्यातून 25 हजार कोटी पाकिस्तानमध्ये गेले. हा पैसा हल्ले करणाऱ्यांपर्यंत पोहोचतात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

  • 15 Feb 2026 09:54 AM (IST)

    नाशिकमध्ये स्फटिक शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील बोरटेंभे परिसरात असलेल्या ‘राज राजेश्वरी धाम’ या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील अद्वितीय ‘स्फटिक शिवलिंग’, जे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव स्फटिक शिवलिंग मानले जाते. पहाटेच्या सुमारास या स्फटिक शिवपिंडीला आकर्षक सजावट करून विधिवत महाआरती करण्यात आली, ज्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने ३०० किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद तयार करण्यात आला आहे. संपूर्ण भारतात मोजक्याच ठिकाणी असलेल्या या स्फटिक शिवलिंगाच्या दर्शनाने भाविक तृप्त होत असून परिसर शिवनामाच्या जयघोषाने दुमदुमला आहे.

  • 15 Feb 2026 09:45 AM (IST)

    नागपूर पोलिसांचे ऑपरेशन थंडर, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

    नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांतर्फे ऑपरेशन थंडर राबविले जात आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत १ कोटी २ लाख ४० हजार रुपये किमतीची ५१२ ग्रॅम एमडी (MD) पावडर जप्त केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोपेडवरून जाणाऱ्या संजय गंगवानी या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत कारवाया वाढवल्या असून, या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

  • 15 Feb 2026 09:36 AM (IST)

    दहावी-बारावी परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त होणार, शिक्षण मंडळाचे कडक पाऊल

    राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अत्यंत कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परीक्षेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर आता थेट अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा सुरू झाली असून, येत्या २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली असून, त्यात शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस आणि महसूल विभागाची स्वतंत्र पथकेही संवेदनशील केंद्रांवर लक्ष ठेवणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्याची तरतूदही यंदा करण्यात आली आहे.

  • 15 Feb 2026 09:28 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीचा महापूर, ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल

    नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विशेष दिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रभू त्र्यंबकेश्वराचे रूप अधिकच मनमोहक दिसत आहे. पहाटेपासूनच देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी सुरक्षेचे तसेच दर्शनाचे चोख नियोजन केले आहे. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तिमय झाली असून, भाविकांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 15 Feb 2026 09:20 AM (IST)

    परळीचे वैद्यनाथ मंदिर रोषणाईने उजळले, आकर्षक सजावटीने वेधले लक्ष

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या परळी येथील श्री वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा आणि विशेष सजावटीमुळे हे पवित्र क्षेत्र अधिकच तेजस्वी दिसत आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. मंदिर प्रशासनाने भक्तांच्या सुलभ दर्शनासाठी आणि सुरक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. सात दिवसांच्या या यात्रेनिमित्त विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • 15 Feb 2026 09:14 AM (IST)

    कल्याणमध्ये MIDC ची जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया

    कल्याण ग्रामीण परिसरातील हेदुटणे गावाजवळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (MIDC) १६०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे तब्बल ३० ते ४० फूट उंचीचे पाण्याचे फवारे हवेत उडत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ही जलवाहिनी मुख्य असल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या धक्कादायक दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

  • 15 Feb 2026 09:08 AM (IST)

    भीमाशंकर नगरी रोषणाईने उजळली, पण भाविकांविना पार पडला सोहळा

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आणि महादेव नगरी विद्युत रोषणाईने लखलखली आहे. मात्र, सध्या मंदिरात सुरू असलेल्या विकास आराखड्यांतर्गत दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांमुळे यंदाचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची शासकीय महापूजा परंपरेनुसार पार पडली. श्रावण महिन्यापर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण करून भाविकांसाठी भव्य मंदिर खुले करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून, भाविकांनी या बदलांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

  • 15 Feb 2026 09:03 AM (IST)

    अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांची मोठी गर्दी

    महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अंबरनाथ येथील ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदा सुरक्षेच्या आणि गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनाने भाविकांना गाभाऱ्यात न सोडता बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली आहे. आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे. वेरूळचे घृष्णेश्वर, परळीचे वैद्यनाथ आणि त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांसह राज्यातील कानाकोपऱ्यातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मुंबईचे ऐतिहासिक बाबुलनाथ मंदिर असो वा अंबरनाथचे प्राचीन शिवालय, सर्वत्र भक्तांचा अलोट उत्साह पाहायला मिळत आहे. भीमाशंकर येथे विकासकामामुळे मंदिर बंद असले तरी प्रशासकीय पूजा थाटात पार पडली. तर पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात शंखनादाने वातावरणात चैतन्य भरले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे आजचा दिवस खऱ्या अर्थाने शिवमय झाला आहे. यासह देश विदेश, महाराष्ट्र, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्य घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.