Maharashtra News LIVE : आखाती देशांमधील परिस्थितीवर मोदींचं लक्ष- एस. जयशंकर

Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : आखाती देशांमधील परिस्थितीवर मोदींचं लक्ष- एस. जयशंकर
| Edited By: | Updated on: Mar 09, 2026 | 11:55 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 09 Mar 2026 11:55 AM (IST)

    केंद्र सरकार तेल, गॅस.. अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे- फडणवीस

    केंद्र सरकार तेल, गॅस.. अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे कोणीही अफवा पसरवू नये, अफवेवर विश्वास ठेवू नये. अफवेवर विश्वास ठेवून साठे करणं आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल. त्यातून डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे, ते कुठेतरी गडबडेल. माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलंय.

  • 09 Mar 2026 11:50 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांकडून जसप्रीत बुमराह, संजू सॅमसनच्या कामगिरीचं कौतुक

    “आयसीसी टी-20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलँडचा पराभव केला, त्यानिमित्त मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो. टी-२० सामन्याच्या इतिहासात अशा प्रकारचं स्कोर करणं, समोरच्या टीमला अशा पद्धतीने गारद करणं हा देखील रेकॉर्ड आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहने न्यूझीलँडच्या टीमला गारद केलं. एकूण टीमचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम राहिला, केवळ एक सामना आपण हरलो. सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या मुंबईचे खेळाडूदेखील या टीममध्ये उत्तम खेळले, अशा सर्वांचं मी अभिनंदन करतो. विधानसभेत आम्ही आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत,” असं फडणवीस म्हणाले.

  • 09 Mar 2026 11:41 AM (IST)

    विरोधकांचं कृत्य निंदनीय असून त्यांना चर्चेत काहीच रस नाही- नड्डा

    विरोधकांचं कृत्य निंदनीय असून त्यांना चर्चेत काहीच रस नाही. सभागृहातील विरोधकांचं वर्तन अयोग्य आहे. विरोधकांना चर्चेत नाही तर सभागृहात गदारोळ माजवण्यात रस आहे, अशा शब्दांत भाजपच्या जे. पी. नड्डा यांनी विरोधकांवर टीका केली.

  • 09 Mar 2026 11:32 AM (IST)

    1 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची बैठक झाली- एस. जयशंकर

    अमेरिका-इराण-इस्रायलच्या युद्धसंघर्षावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन दिलं. “1 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची बैठक झाली. आखाती देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. युद्धाची झळ अनेक देशांपर्यंत पसरतेय. मोदींचं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. ऊर्जेसंदर्भातील गरजांसाठी भारत सतर्क आहे. भारत आखाती देशांच्या संपर्कात आहे. ज्यांना मदत हवी, त्या सर्वांसाठी आम्ही काम करतोय. मोदींनी स्वत: आखाती देशांसोबत चर्चा केली आहे,” असं जयशंकर म्हणाले.

  • 09 Mar 2026 11:25 AM (IST)

    आखाती देशांमधील परिस्थितीवर मोदींचं लक्ष- एस. जयशंकर

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. आखाती देशात 28 फेब्रुवारीपासून तणाव सुरू आहे. तिथल्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष आहे. भारतीय नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत दिली. यावेळी राज्यसभेत चर्चेची मागणी करत विरोधकांनी गोंधळ घातला.

  • 09 Mar 2026 11:20 AM (IST)

    गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प बाधितांना कांजूर पश्चिम इथं मिळणार सदनिका

    गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प बाधितांना कांजूर पश्चिम इथं आधुनिक सुविधांनी युक्त ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या टुमदार सदनिका मिळणार आहेत. ९०६ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर असून त्यापैकी पैकी २५२ प्रकल्प बाधितांचे पहिल्या टप्प्यात पुनर्वसन होणार आहे. बांधकाम वेळेत पूर्ण करुन लवकरात लवकर सदनिका प्रकल्पबाधितांना सुपूर्द कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

  • 09 Mar 2026 11:09 AM (IST)

    मनसेची आजपासून सदस्य नोंदणी सुरू

    रायगडमध्ये मनसेचा 20 वा वर्धापन दिन साजरा केला जात असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “वर्दळीच्या ठिकाणी सदस्य नोंदणीचे टेबल्स लावा. मनसेची आजपासून सदस्य नोंदणी सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी या नोंदणीत भाग घ्यावा.”

  • 09 Mar 2026 10:57 AM (IST)

    सोलापुरात तापमानाचा पारा वाढला, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य ओकतोय आग

    राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सोलापूरकरांना तीव्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोलापूरच्या तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे सरकला आहे. काल हंगामातील सर्वाधिक ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बाहेर पडताना टोपी, रुमाल आणि स्कार्फचा वापर करून स्वतःचा बचाव करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

  • 09 Mar 2026 10:47 AM (IST)

    रामकुंडातील हुल्लडबाजीप्रकरणी गुन्हे दाखल करा; अन्यथा न्यायालयात जाणार, गोदाप्रेमींचा इशारा

    नाशिकच्या पवित्र रामकुंडावर तरुणांकडून चपला, बूट आणि कपडे कुंडात फेकण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ही हुल्लडबाजी झाल्याने गोदाप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. गोदावरी संवर्धन समिती आणि सुरक्षा रक्षक केवळ नावालाच उरले असून, या हुल्लडबाजांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • 09 Mar 2026 10:37 AM (IST)

    सांगलीच्या मिरजेत भारतीय विजयाच्या जल्लोषाला गालबोट; हुल्लडबाजांवर पोलिसांचा लाठीमार

    भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीच्या मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला. या उत्सवादरम्यान काही जणांनी हुल्लडबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी अखेर सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी जल्लोषासाठी परवानगी दिली होती, मात्र या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 09 Mar 2026 10:27 AM (IST)

    जागतिक पातळीवर भारताची जागा काहीच नाही – संजय राऊत

    जागतिक पातळीवर भारताची जागा आता काहीच नाही. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारुन करावी लागत आहे. १९४७ पर्यंत देश ब्रिटीशांचा गुलाम होता, त्या गुलामगिरीविरोधात आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला. आताच्या राज्यकर्त्यांचे पूर्वज त्यात नव्हते. अलीकडच्या काळात भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. देशाच्या पंतप्रधानांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान झाला यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मत व्यक्त करण्यासाठी आणि भाषण करायला वेळ आहे, पण या देशाचा सातत्याने अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून अपमान होत आहे. त्यावर मोदी काहीही बोलायला नाहीत. यावर आम्ही चर्चा करण्यासाठी संसदेत वेळ मागितला होता. त्यावर संसदेचे अध्यक्ष यावर विरोधकांना बोलू देत नाही. हे देखील एक हुकूमशाही आणि अप्रत्यक्ष गुलामगिरी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 09 Mar 2026 10:17 AM (IST)

    …म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील ठराव आणला – संजय राऊत

    या देशाच्या संसदेत गेल्या १० वर्षांपासून भारतीय घटनेचा संसदीय लोकशाहीचा गळा ज्या पद्धतीने घोटला जातोय, त्याच्या विरुद्धचा एक उद्रेक विरोधी पक्षांचा आहे. विरोधी पक्षनेत्यांना, विरोधी नेत्यांना बोलू द्यायचं नाही. त्यांना सातत्याने अपमानित करायचं. नियमाने संसद चालवायची नाही. अनेक राष्ट्रीय हिताचे आणि सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा घडू द्यायची नाही. हे गेल्या काही काळापासून संसदेच्या सभागृहात सुरु आहे. अशावेळेला सरकार पक्षाने विरोध पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन त्यांना काढणं सहज शक्य होते, पण आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे यात आम्ही विरोधी पक्षाचा आवाज सभागृहात पोहोचू देणार नाही, त्यावर शेवटी एक उपाय आणि हत्यार म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील ठराव विरोधी पक्षांनी आणलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

  • 09 Mar 2026 10:06 AM (IST)

    कांदिवलीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला, आयुक्त घटनास्थळी, आज किरीट सोमय्या करणार दौरा

    कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये फेरीवाल्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आता राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी हल्लेखोरांमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप केला असून, प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत खुद्द महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाची पाहणी करून अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आज दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या या भागाला भेट देणार असल्याने या प्रकरणाला आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

  • 09 Mar 2026 09:50 AM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेत सहभागी

    कळमनुरी ते हिंगोली 20 किमी पदयात्रेला सुरुवात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पदयात्रेत सहभागी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा,पिक विमा सरसगट शेतकऱ्यांना देण्यात यावा,यासह विविध मागण्यांसाठी पदयात्रा सुरू.  दुपारी हिंगोली शहरातील गांधी चौकात हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाषणाने पदयात्रेचा होणार समारोप …

  • 09 Mar 2026 09:40 AM (IST)

    बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा नवा दिवस

    बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा नवा दिवस बच्चू कडू यांचा आज सलोना ते चिखलदरा त्रिशूल तांडव मोर्चा. बच्चू कडू यांचा सरकारला दुपारी चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम. सरकारला चार वाजेपर्यंत आमचा वेळ आहे त्यानंतर आमच आंदोलन कुठल्याही स्तरावर जाऊ शकत बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. मागील आठ दिवसांपासून मेळघाट मधील मूलभूत प्रश्नांवर बच्चू कडूंची सुरू आहे संघर्ष यात्रा.

  • 09 Mar 2026 09:30 AM (IST)

    नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

    नंदुरबार नगरपालिकेच्या शिवसेना शिंदे गटाचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा रिसॉर्ट येथे झालेल्या चौधरी समाजाच्या कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या महिलेचा अपमान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  उपनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी चे गुन्हा दाखल झाला आहे…..

  • 09 Mar 2026 09:20 AM (IST)

    अक्कलकोट तालुक्यात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्याने भितीचे वातावरण

    अक्कलकोट तालुक्यातील जेऊरवाडी, कल्लहिप्परगे गावात बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. यावेळी जमिनीवर आढळलेल्या पायांच्या ठशांची तपासणी करण्यात आलीय. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्याचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असले, तरी बिबट्याच्या वावराची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • 09 Mar 2026 09:06 AM (IST)

    इंडियन एअरलाइन्सचा अत्यंत मोठा निर्णय

    इंडियन एअरलाइन्स ९ मार्च रोजी ५० उड्डाणे चालवण्याची तयारी करत आहे. पश्चिम आशियातील हवाई क्षेत्राच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून, इंडियन एअरलाइन्स ९ मार्च रोजी ५० उड्डाणे चालवण्याची तयारी करत आहे.

  • 09 Mar 2026 08:57 AM (IST)

    निफाड तालुक्यातील सायखेडा येथे महिला दिनाच्या दिवशी धक्कादायक घटना…

    निफाड तालुक्यातील सायखेडा येथे महिला दिनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे.  किरकोळ गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून काही युवकांनी सायखेडा येथील डॉक्टर दांपत्याला मारहाण केली. गाडीची तोडफोड करत जिवे मारण्याची दिली. धमकी घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिक सायखेडा चौफुली वर येत घोषणाबाजी करत करत रस्तारोको केला. सायखेडा पोलीसांनी तीन पैकी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

  • 09 Mar 2026 08:50 AM (IST)

    मालवण कोळंब येथे अज्ञाताचा गाव कमिटी अध्यक्षावर गोळीबार

    मालवण कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते बचावले आहेत मात्र घराच्या परिसरात सर्वत्र बंदुकीचे छरे पडलेले दिसून आले आहेत. दरम्यान गोळीबार करणारा व्यक्ती पळून गेला आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणी आणि उडालेल्या छरे यांची तपासणी करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

  • 09 Mar 2026 08:40 AM (IST)

    इथेनॉल धोरणाचा ऊस, मका, तांदूळ उत्पादकांना फायदा

    केंद्र सरकारने १ एप्रिलपासून देशात विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनात दरवर्षी सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि देशातील ऊस, मका, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना थेट ४० हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • 09 Mar 2026 08:30 AM (IST)

    महाराष्ट्राची दक्षिणकाशी पैठण नगरी वारकऱ्यांनी दूम दूमली.

    महाराष्ट्राची दक्षिणकाशी पैठण नगरी वारकऱ्यांनी दूम दूमली. आज पासून संत एकनाथ महाराजांच्या नाथ षष्ठीला उत्साहात सुरुवात, 765 पेक्षा अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. लाखो वारकरी एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पैठणमध्ये दाखल झालेत. गोदावरी नदीच्या तीरावर भरला वैष्णवांचा मेळा, भानुदास, एकनाथाचा वारकऱ्यांच्या मुखातून जल्लोष… आज पासून सुरुवात 11 मार्चला काल्याच्या कीर्तनाने नाथ षष्ठीची सांगता होणार..

  • 09 Mar 2026 08:25 AM (IST)

    गिरीश महाजन यांच्या जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल..

    गिरीश महाजन यांच्या जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नाशिकमध्ये रंगपंचमी निमित्त महाजन यांनी सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली.  सुधाकर बडगुजर , शाहू खैरे यांच्या कार्यक्रमात ठेका धरला.  महाजन यांनी पहिल्यांदाच मारली पारंपरिक रहाडीत उडी.. पाण्याच्या शॉवर वर देखील महाजनांनी डान्स केला. महाजन यांच्याकडून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील रंग लावत रंगपंचमी साजरी केली…

  • 09 Mar 2026 08:20 AM (IST)

    नाशिक जीएसटी अधिकारी सव्वा कोटी लाच प्रकरण

    नाशिक जीएसटी अधिकारी सव्वा कोटी लाच प्रकरण समोर आलंय…  प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये…  विभागातील आणखीही काही अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. विभागात सुरू आलेल्या कामाबाबत ACB कडून माहिती घेतली जात आहे. एक सहायक आणि दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे,  मुंबईच्या एसीबी पथकाने जीएसटी अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे. मुंबई एसीबी चे पथक पुन्हा जीएसटी विभागात येऊन चौकशी करत आहे. एका बांधकाम व्यावसायिका विरोधात कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात लाच मागितली होती.

  • 09 Mar 2026 08:12 AM (IST)

    नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता

    नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अकोल्यात सर्वाधिक ४०.८°C तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये तापमान ३७.१°C वर पोहोचले तर, मालेगावमध्ये ३८°C तापमानाची नोंद झाली आहे.  पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  कोरड्या हवामानामुळे उन्हाचा कडाका वाढला आहे.  हवामान विभागाचा अंदाजानुसार काही भागात उष्णतेची लाट येणार आहे… मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा 38 च्या घरा पोहोचला आहे.

  • 09 Mar 2026 08:11 AM (IST)

    रंगपंचमी नंतर नाशिकमध्ये तरुणांची रामकुंडावर हुल्लडबाजी

    रंगपंचमी नंतर नाशिकमध्ये तरुणांची रामकुंडावर हुल्लडबाजी पाहायला मिळाली.  पवित्र गोदावरीच्या पात्रात चप्पल फेकत गोदावरी प्रदूषित केली. रंग काढण्यासाठी अनेकांनी गोदावरीत उड्या मारल्या. मात्र तरुणांच्या बेजबाबदार वर्तनाने गोदापात्र प्रदूषित झाले. गोदाघाट आणि रामकुंड परिसरात फाटके कपडे, चप्पलांचा खच साचलेला आहे, यामुळे रंगपंचमीला गोदाघाटावर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 09 Mar 2026 08:09 AM (IST)

    लोटे MIDC स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा

    लोटे MIDC स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दोन दिवसांपूर्वी डॉक्टर खान इंडस्ट्रियल कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीत स्फोट झाला होता. इथाइल सिलिकेट केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात ११ कामगार जखमी झाले होते. चौकशीनंतर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कामगारांना हेल्मेट, गमबूट, सेफ्टी ड्रेस न दिल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.  कंपनीचे मालक, मॅनेजर आणि प्लांट इन्चार्जवर  खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा काही सवंग लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीमुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा महसुली तसेच राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत राजकोषीय तूट ही तीन टक्क्यांपर्यंत असावी, अशी तरतूद असताना यंदाच्या आर्थिक वर्षात ही तूट 2. 97 टक्क्यांपर्यंत गेली आहे. याबरोबरच कर्जाचा बोजा 11 लाख कोटींपेक्षा अधिक होणार असताना, कर्जावरील व्याज फेडण्यासाठीही सर्वाधिक रक्कम खर्च होणार आहे. तर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध दोन मोठ्या कारवाई केल्या आहेत. या कारवाईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांकडून 12 लाख 82 हजार रुपये किंमतीचे 43 किलो अंमली पदार्थ जप्त केले. दुसरीकडे, भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला, पण तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे आनंदाला गालबोट लागला… गर्दीत फटाके फोडल्याने पोलिसांनी खुल्लडबाजांना हुसकावले… महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा…

Follow Us