
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडीला चांगलीच गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, आजी माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहेत. त्यातच आता लवकरच महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याकडे वळवून घेण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्ष आग्रही आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. आज शिवसेनेत मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. कोकणातून शिवसेनेने या ऑपरेशनला सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर शिवसेनेच्या गळाला राज्यातील कोणते नेते लागणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे ॲापरेशन टायगर पुन्हा सक्रीय झाले आहे.
आज मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यापाठोपाठ राज्यातील तीन माजी आमदारांचाही आज पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे. विधिमंडळ अधिवेशन काळात शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला जाणार आहे. मुंबईतील माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बाळासाहेब भवन या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे. त्यानंतर मुक्तगिरी बंगल्यावर तीन माजी आमदारांचा पक्ष प्रवेश होणार आहे. आता शिंदे गटात प्रवेश करणारे तीन माजी आमदार कोण, तीन माजी नगरसेवक कोण, याची चर्चा रंगली आहे.
शिवसेना शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांना संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. वैजापुर-गंगापुर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्तागिरी येथे दाखल झाले आहेत. मुक्तागिरी निवास्थानी पक्षप्रवेशासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.