मराठवाड्यात दमदार पाऊस, हिंगोलीत पुरामुळं दोघांचा मृत्यू, नांदेडमध्ये एकाचा मृत्यू, पिकांनाही फटका

| Updated on: Sep 05, 2021 | 3:26 PM

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस झाला. हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दोघांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात दमदार पाऊस, हिंगोलीत पुरामुळं दोघांचा मृत्यू, नांदेडमध्ये एकाचा मृत्यू, पिकांनाही फटका
हिंगोलीत चिमुकलीचा मृत्यू
Follow us on

मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस झाला. हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातही विविध ठिकाणी एका व्यक्तीनं पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं जीव गमवाला आहे. तर उस्मानाबादमध्येही मुसळधार पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान झालं आहे.

हिंगोलीत दोघांचा मृत्यू

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथील शेतकरी संजय धनवे हे काल सायंकाळी दुध काढण्यासाठी शेतात जात असताना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेले होते. आज सकाळी नातेवाईकांनी शोध घेतला असता नंदगाव शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारातून काल सायंकाळी संध्या दागडे 6 वर्षीय चिमुकली आजोबा सोबत शेतातून परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेली होती तिचा मृतदेह तेथून दिड किलो मीटर अंतरावर आज सकाळी सापडला एका झुडपाला अडकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून कुटुंबानि एकच हंबरडा फोडला..

दुचाकीसह तरुण वाहून गेला मात्र बचावला

हिंगोली जिल्ह्यात काल दुपार नंतर ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला होता. कालच्या पावसाने दोघांचा बळी घेतला तर अनेक जणांचे जीव वाचले .जिल्ह्यातील आडोळ रस्त्यावरील सिद्ध नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना एक तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेला होता. काही अंतरावर तरुण झाडाला धरून पुराच्या बाहेर निघाला.त्यामुळे त्याचा जीव वाचला तर आज सकाळी त्याची दुचाकी सापडली आहे.

नांदेडमध्ये एकाचा मृत्यू , महिला वाहून गेली

नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी सांयकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्याना पूर आलाय. याच दरम्यान भोकर तालुक्यातील डौर इथे 42 वर्षीय लक्ष्मीबाई चंदापुरे ही महिला घराकडे येत असताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून बेपत्ता झालीय, तिचा शोध घेणे सुरू आहे. तर दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यातील कोल्हारी गावात ओढ्याला आलेल्या पुरात 40 वर्षीय सिद्धार्थ शेळके हा शेतकरी वाहून गेलाय. या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी शिवारात आढळलाय. शनिवारी अनेक भागात रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले होते, त्यामुळे नागरिकांनी मानवी साखळी करत घर गाठलंय. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी शेतीचे मात्र मोठे नुकसान होईल अशी भीती आहे.

उस्मानाबादमध्ये संततधार

उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री पडलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओढे किनारी असलेल्या सोयाबीन व अन्य पिकांच्या शेतात पाणी साचले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या महिन्यात पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता व आर्थिक संकटात अडकला होता. त्यातच आता या महिन्यात पाऊस पडल्याने आहे ती पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीच्या बांधावर पाणी साचल्याने ही पिके खराब होणार आहेत त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.

जालन्यात गल्हाटी नदीला पूर

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल रात्री पडलेल्या पावसाने गल्हाटी नदीला मोठा पूर आला. परीसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदी दुथडी भरून वाहत आहे तर घुंगरडे हदगाव या गावात नदीला पूर आल्याने घुडघ्या एव्हडे पाणी शिरले आहे. सध्या गल्हाटी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या पावसाने अनेक गावचा संपर्क तुटला आहे.

इतर बातम्या:

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले, एकाला वाचवण्यात यश, दोघांचा पत्ताच नाही

Maharashtra Rain update due to heavy rainfall and flood water two died in Hingoli one in Nanded