
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांच्या घटनांनी हादरून टाकले आहे. महाराष्ट्रात नागपूर, रायगड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये लहानग्या भावंडांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातांमुळे रस्त्यांवरील सुरक्षा व्यवस्थेवर आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे म्हटलं जात आहे.
नागपूर शहरातील रिझर्व्ह बँक चौक परिसरात पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक अपघातात ११ वर्षीय रुद्र सुनील सिंगलधुपे आणि १२ वर्षीय सिमरन सुनील सिंगलधुपे या भावा-बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रिझर्व्ह बँक चौक आणि झीरो माईल चौकात रात्रीच्या सुमारास अवजड वाहनांमुळे नेहमीच अपघात होत असल्याने हा अपघाताचा स्पॉट बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुले त्यांचे नातेवाईक शेषनाथसिंग जागेश्वरसिंग यांच्यासोबत दुचाकीने जात होते. रिझर्व्ह बँक चौकात भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रुद्र आणि सिमरन खाली पडले. यावेळी ट्रक रुद्रच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सिमरन हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. यावेळी दुचाकी चालक जागेश्वरसिंग हे गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघे काठीवरून लग्न आटोपून मकरढोकड्याला आपल्या गावी जात होते. त्यावेळी हा दुर्दैवी अपघात घडला.
पेण-खोपोली मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काल (२ डिसेंबर) रात्री सुमारे ११ वाजता आंबेघर पेट्रोल पंपाजवळ हॉटेल टिक्का समोर अपघात झाला. या अपघातात राज वसंत पवार (२३) या तरुणाचा मृत्यू झाला. आंबेघरहून पेणकडे जाणाऱ्या ज्युपिटर या दुचाकीला पेण शहराच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत राज वसंत पवार गंभीर जखमी झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र करण चंद्रहास प्रसाद (रा. वडगाव) हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी याच मार्गावर गणपतीवाडी येथील हॉटेल सौभाग्य इन समोर दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. सातत्याने होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पेण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे लातूर-उमरगा रोडवर मोटारसायकल आणि इनोव्हा गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात भिमाबाई गणपती बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा प्रेमनाथ बिराजदार हे गंभीर जखमी झाले आहेत. आई आणि मुलगा मोटारसायकलवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा गाडीने त्यांना धडक दिली. यात हा अपघात घडला. तर प्रेमनाथ यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
तर पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर इसारवाडी शिवारात काल सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर आणि ॲपेरिक्षा यांच्या जोरदार धडकेत एक महिला मजूर ठार झाली असून, आठ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत.
पिंपळवाडी पिराची येथील महिला मजूर सकाळी कामानिमित्त धनगावकडे निघाल्या होत्या. इसारवाडी शिवारात दुभाजका ओलांडत असलेल्या ट्रॅक्टरला ॲपेरिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ॲपेरिक्षाच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात ६६ वर्षीय मेहमुदा लाला शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी महिलांना तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यातील गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.