Maharashtra ZP Election Result : 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितींची सत्ता कोणाकडे? आज निकालाचा महासंग्राम, दुपारपर्यंत स्पष्ट होणार चित्र

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गसह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार?

Maharashtra ZP Election Result : 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितींची सत्ता कोणाकडे? आज निकालाचा महासंग्राम, दुपारपर्यंत स्पष्ट होणार चित्र
Maharashtra ZP and Panchayat Samiti Election
| Updated on: Feb 09, 2026 | 8:28 AM

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नियोजित केंद्रांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विशेषतः पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने मतदारांनी नक्की कोणाला कौल दिला आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांतील पक्षीय बलाबल, वाढलेला मतदानाचा टक्का आणि दिग्गजांची पणाला लागलेली प्रतिष्ठा यामुळे या निकालांचे पडसाद आगामी राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, दुपारपर्यंत सत्तेचे पहिले स्पष्ट कल समोर येण्यास सुरुवात होईल.

पुणे जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गणांसाठी मतमोजणी केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान झाले आहे. यातील वेल्हे तालुक्यात सर्वाधिक ७९.३० टक्के तर बारामतीत सर्वात कमी ५४.९० टक्के मतदान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला येथे स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट शरद पवार आणि अजित पवार गट एकत्रित लढल्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

कोल्हापुरात उच्चांकी ७४ टक्के मतदान झाले असून, सतेज पाटील, धनंजय महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. करवीर तालुक्यातील १२ जिल्हा परिषद जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निकालात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदे गट मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. सध्या १२ केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरू आहे.

सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत आहे. येथे ५० जिल्हा परिषद आणि १०० पंचायत समिती जागांसाठी निकाल जाहीर होणार आहे. कोकणात राणे फॅक्टर पुन्हा एकदा यशस्वी ठरतो की स्थानिक समस्यांमुळे जनमत बदलले आहे, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

किती जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा आज निकाल?

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यात किती जिल्हा परिषद गट (जागा) आणि किती पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे, याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

अनुक्रम जिल्हा जिल्हा परिषद गट (जागा) पंचायत समित्यांची संख्या
पुणे ७३ जागा १३ पंचायत समित्या
सोलापूर ७२ जागा ११ पंचायत समित्या
कोल्हापूर ६७ जागा १२ पंचायत समित्या
सातारा ६४ जागा ११ पंचायत समित्या
छत्रपती संभाजीनगर ६३ जागा ९ पंचायत समित्या
सांगली ६१ जागा १० पंचायत समित्या
रायगड ५९ जागा १५ पंचायत समित्या
लातूर ५८ जागा १० पंचायत समित्या
रत्नागिरी ५६ जागा ९ पंचायत समित्या
१० धाराशिव ५५ जागा ८ पंचायत समित्या
११ परभणी ५३ जागा ९ पंचायत समित्या
१२ सिंधुदुर्ग ५० जागा ८ पंचायत समित्या
एकूण ७३१ जागा १२५ पंचायत समित्या