
बीडमधील वाढती गुन्हेगारी व त्या गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय ही राज्यासाठी अतिशय चिंतेची बाब बनली आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे तिथले रहिवासी दहशतीत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे, सर्वत्र त्या घटनेचे पडसाद उमटलेत. हे कमी की काय म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. कुख्यात गुंड व भाजपा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीरांसह ही मारहाण केली आहे. आणि मारहाण करणारा तो आरोपी भोसले हा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्याने प्रकरण आणखीनच तापले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या मुद्यावरून धस यांच्यावर टीका केली होती. भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
आज त्यांनी पुन्हा माध्यमांसमोर या मुद्यावरून प्रश्न विचारत धस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सुरेश धसांनी स्टेटमेंट द्याव, या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात ते सांगावं. नाहीतर उद्या उठून हाही दुसरा वाल्मिक कराड बनेल, असे म्हणत दमानिया यांनी चांगलाच हल्ला चढवला.
भोसलेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे
त्या भोसलेचे सुरेश धसांबरोबर अनेक फोटो आणि व्हिडीओ आले आहेत. सुरेश धस यांनी स्टेटमेंट द्यावं. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात. उद्या तो वाल्मिक कराड होईल. हे लोक वाटेल तसं लोकांना मारत आहेत. सुरेश धस कोण आहे हा सतीश भोसले? सतीश भोसले बाबत धस यांनी सांगावं अशी मागणी त्यांनी दमानिया यांनी केली.
मी काही व्हिडीओ माझ्या सोशल मीडियावर टाकले आहेत. रक्तबंबाळ झालेल्या माणसाचे दात सतीश भोसलेने पाडले आहेत. भोसलेवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. सुरेश धसांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो. तो सरकार म्हणतो. सुरेश धस यांनी यावर खुलासा करावा. हे सर्व एका माळेचे मनी आहेत अशी टीकाही अंजली दमानिया यांनी केली.
कुठून आलं येवढं सोनं ?
त्या भोसलेच्या प्रत्येक व्हिडीओत आणि फोटोत त्यांच्या हातात सोनं आहे. गळ्यात सोनं आहे. मी बाई असून माझ्या हातात सुद्धा सोन्याच्या बांगड्या नाहीत. यांच्याकडे कुठून आलं येवढं सोनं ? असा सवाल दमानिया यांनी विचारला. . फडणवीस यांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोललं पाहिजे. नाही तर मी अधिवेशनाबाहेर प्रोटेस्ट करणार आहे. आजचा दिवस मी वाट पाहीन. उद्या सकाळपासून मी ठिय्या देणार आहे. मी हे सर्व फोटो घेऊन बसणार आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. बास झाले हे सर्व धंदे महाराष्ट्रात अशी दहशत नको, असेही दमानिया यांनी सुनावलं.
बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मारहाणीचा हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात होते. यात सतीश भोसलेने बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील एका गरीब व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर आली.यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.
तर त्याच्यावर कारवाई करावी
दरम्यान, सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी त्या मारहाणीचं समर्थन केलं नाही. त्यांनी म्हटलं तर भेट घेईल. मला काय भेट घ्यायला? मी सतीश भोसलेला ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. माझ्या पाठी तो असे काही उद्योग करतो हे मला काय माहीत? त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो, असं सुरेश धस म्हणाले.
सतीश भोसलेचा फोटो व्हायरल झाली आहे. मी माहिती घेतली आहे. ही घटना दीड वर्षापूर्वीची आहे. ज्याला मारहाण झाली त्याने फिर्याद केली असेल तर जी कारवाई करायची ती केली पाहिजे. कोण कुणाला काय म्हणतो ते रोखू शकत नाही. तो मला बॉस म्हणतोय तर बॉसचं म्हणणं आहे की त्याच्यावर कारवाई करावी, असंही धस म्हणाले.